राज्याच्या डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूमला धमकीचा मेल
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत दोन दिवसात बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचा धमकीचा मेल आला आहे. ‘डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूम’ला हा धमकीचा मेल आला आहे. महाराष्ट्र नियंत्रण पोलिस कक्षाकडून मुंबई पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. राज्यात कुठेही दुर्लक्ष करू नका, तसेच सोमवार ते बुधवारदरम्यान सतर्क राहण्याचा इशाराही या मेलमधून देण्यात आला आहे. तसेच हा मेल कोणी केला याचा तपास सध्या सुरू करण्यात आला आहे.
याबाबतची अधिकची माहिती अशी की, राज्याच्या डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूमला हा धमकीचा मेल आला आहे. दोन दिवसांत राज्यात किंवा राज्याच्या बाहेर कुठेही हा बॉम्ब ब्लास्ट होईल असे या मेलमध्ये म्हटले आहे. हा मेल आल्यानंतर मुंबई पोलिसांना याची माहिती देण्यात आली असून, पोलिसांकडून हा मेल कोणी पाठवला याचा तपास केला जात आहे. सोमवार ते बुधवार सतर्क राहण्याच्या सूचना देखील या मेलमधून देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, हा धमकीचा मेल नेमका कोणी पाठवला आहे, कोणी खोडसाळपणा केला आहे का, निनावी मेल आहे का, या अनुषंगाने मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे. परंतु, अद्यापही पोलिसांना याबाबत काही सापडले नाही.
इंडिगो विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी
सध्या गेल्या काही दिवसांपासून विमानाला बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशीच पुन्हा एकदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी इंडिगो विमानाला मिळाली आहे. कोलकातावरुण मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली आहे.