Buldhana farmers protest
बुलढाणा: सध्या राज्यभर भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. अशावेळी शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक आधार देण्याऐवजी शासनाने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली. ५ हजाराची भीक शासनाने दिली. परंतु, आम्हाला भीक नको आमच्या घामाचे दाम हवे, असे म्हणत क्रांतिकारी शेतकरी पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या सोमवारी देऊळगावराजात अनोखे भीक मांगो आंदोलन केले. या आंदोलनात स्वतः शेतकरी नेते रविकांत तुपकर सहभागी झाल्याने हे आंदोलन चांगलेच लक्षवेधी ठरले.
भीक मागून जमा झालेली रक्कम तहसीलदार यांच्यामार्फत शासनाला जमा करण्यात आली. तसेच मागण्यांचे निवेदन देखील सुपूर्द करण्यात आले. कोणत्याच अटी आणि मर्यादा न ठेवता हेक्टरी १ लाख नुकसानभरपाई द्या. अन्यथा, शेतकऱ्यांच्या तीन रोषाला सामोरे जाण्यासाठी तयार रहा, असा गंभीर इशाराही देण्यात आला. सध्या संपूर्ण राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती ओढावली आहे. शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य जनता दुष्काळ आणि महागाईने होरपळून जात आहे. अशावेळी मायबाप सरकारने भरघोस मदत देण्याचे सोडून शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची भीक देऊन त्यांची क्रूर बेष्टा केली आहे. त्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकार चांगलेच भडकले आहे. त्याचाच परिणाम आज देऊळगाव राजा शहरात देखील दिसून आला.
शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही म्हणून क्रांतिकारीच्या शिलेदारांनी देऊळगाव राजा शहरात भीक मागून आंदोलन करून निधी जमा केला. जमा झालेली ही मदत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत शासनाकडे जमा करण्यात आली. प्रचंड दुष्काळ असताना कुंभमेळा घेण्यासाठी करोडो रुपये सरकारकडे आहेत, दुष्काळाच्या परिस्थितीतही करोडो रुपयांच्या वाहन खरेदीसाठी शासनाकडे पैसे आहेत, मंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यासाठी पैसे आहेत. परंतु, शेतकऱ्यांना देण्यासाठीच पैसे नाहीत का? असा संतप्त सवाल यावेळी तुपकर यांनी केला.
मंत्री, आमदार, खासदार, सचिव, जिल्हाधिकारी यांचे ३ महिन्याचे पगार थांचवा, कुंभमेळा रद करा, मंत्र्यांच्या दौऱ्यावरील खर्च बंद करा आणि अन्नदात्या शेतकऱ्याला मदत करा, अशी मागणी त्यांनी केली.चारा छावण्यांचे नियोजन डिसेंबर मध्ये न करता आतापासून चाराचे नियोजन करावे, छावनीला नको दावणीला चारा ग्रा, हेक्टरची मर्यादा न ठेवता हेक्टरी १ लाख नुकसानभरपाई द्या: अशी आग्रही मागणी तुपकर यांनी केली. भीक मागून जमा केलेली रक्कम आणि मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत शासनाकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी मधुकर शिंगणे, जुल्फेगार शेठ, सहदेव लाड, प्रदीप हिवाळे, बालाजी सोसे, वसंतराव पाटील, पुरुषोत्तम शिंगणे, देविदास शिंगणे, जिलानी भाई, राजू नागरे, गजानन जायभाये, किसान नागरे, पिंटू डोके, संदीप शिंदे, गणपत शेळके, राजेंद्र शिंगणे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.
शेतकरी सध्या प्रचंड संकटात आहे, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासह मानसिक आधार देणे गरजेचे असताना सरकार मात्र शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करत आहे. कुंभमेळा घ्यायला पैसे आहेत, दुष्काळातही करोडोंचे वाहन खरेदी करायला पैसे आहेत मंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यासाठी करोड रुपये खर्च करायला पैसे आहेत. मात्र शेतकऱ्यांना द्यायलाच पैसे नाहीत का? असा संतप्त सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला. गावगाड्यातील शेतकऱ्यांना एकत्र करून या सरकारला बळीराजाची ताकद दाखवून देऊ. त्याची तयारी देखील सुरू झाली. त्यामुळे आता लवकरच राज्यभर आक्रमक आंदोलन उभारणार आहे, असा इशारा यावेळी तुपकर यांनी दिला.






