फोटो सौजन्य - Social Media
मोताळा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी आरोपीला पोलिसांकडून संरक्षण दिले जात असल्याचा गंभीर आरोप पीडित मुलीच्या पालकांनी केला आहे. या प्रकरणात न्याय मिळावा आणि मुलीचा तातडीने शोध लावावा, या मागणीसाठी पालकांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून, शनिवारी या उपोषणाचा सहावा दिवस होता. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मोताळा तालुक्यातील तालखेड येथील शेतकरी सुनील सपकाळ यांनी याप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, २१ एप्रिल रोजी त्यांची अल्पवयीन मुलगी शिवणक्लाससाठी घराबाहेर पडली होती. मात्र, दिवसभर उलटूनही ती घरी परतली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरात तिचा शोध घेतला. सर्वत्र शोध घेऊनही मुलगी सापडली नसल्याने अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
घटनेनंतर बोराखेडी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. मात्र, दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही मुलीचा शोध लागलेला नाही. तपासात कोणतीही ठोस प्रगती होत नसल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी तपास गांभीर्याने न करता आरोपीला संरक्षण देण्याची भूमिका घेतल्याचा आरोप सुनील सपकाळ यांनी केला आहे.
यासंदर्भात १२ जून रोजी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेही लेखी तक्रार सादर केली. मुलीचा तातडीने शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी या निवेदनातून केली आहे. मात्र, त्यानंतरही अपेक्षित कारवाई न झाल्याचा दावा पालकांनी केला आहे.
न्याय मिळत नसल्याची भावना झाल्याने पीडित मुलीच्या आई-वडिलांनी अखेर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला. सोमवारपासून सुरू झालेल्या या आंदोलनाचा शनिवारी सहावा दिवस होता. उपोषणस्थळी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक भेट देऊन कुटुंबाला पाठिंबा देत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात प्रशासन आणि पोलिसांकडून काय भूमिका घेतली जाते, तसेच मुलीचा शोध कधी लागतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पालकांनी न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, या प्रकरणाचा तपास वेगाने करून सत्य समोर आणावे, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे.






