Onion truck robbery on Samruddhi Expressway
या कारला चोरट्यांनी ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी व सायरन लावलेले आढळले. महामार्गावर प्रवासादरम्यान पोलिसांची धूळफेक करण्यासाठी असा प्रकार केल्याचे दिसून आल्याने तपास अधिक गंभीरपणे केला जात आहे. ट्रकचालक मिराज अहमद ऐजाज अहमद (२८, रा. थोन, जि. कौसंबी, उत्तर प्रदेश) हा सीजी ०४ /पीपी- ९११३ क्रमांकाचा ट्रकद्वारे नाशिक जिल्ह्यातून ३० टन ५६० किलो कांद्याची (किंमत ११ लाख ५० हजार) झारखंड राज्याकडे भाडेतत्त्वावर वाहतूक करत होता.
डोणगाव पोलिसांनी अमानी (ता. मालेगाव) च्या महामार्ग पोलिस चौकीला सतर्क केल्याने पीएसआय प्रकाश सरनाईक यांच्या पथकाने नाकाबंदी केली व अपहरण झालेला कांद्याचा ट्रक व संशयित स्कोडा कार अडवून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ संतोष खांडे, डोणगावचे ठाणेदार गणेश इंगोले, एपीआय राहूल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास डोणगाव पोलिस करीत आहेत.
शुक्रवारी रात्री ११.३० च्या सुमारास समृद्धी महामार्गावर मेहकर ते मालेगाव दरम्यान डोणगावजवळ एका पांढऱ्या कारमधून आलेल्या अज्ञात ४ लुटारूंनी मार्गात कार आडवी लावून ट्रक अडवला होता. चालक मिराज अहेमद याला बेदम मारहाण करून त्याच्या ताब्यातील कांद्यासह भरलेला ट्रक (एकूण मुद्देमाल ३६ लाख ५० हजार) पळवून नेला होता. या घटनेने खळबळ उडाली होती.






