
Soyabean
कृषी विभागाने भविष्याचा विचार करता घरगुती सोयाबीन बियाणे जतन व साठवणूक मोहीमेला सुरूवात केली आहे. तसेच, याबाबत शेतकऱ्यांमध्ये व्यापक प्रबोधन केले जात आहे. कृषी अधिकारी संतोष डाबरे व कृषी उपसंचालक अनुराधा गावडे यांनी शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने बियाणे जतन करण्यासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शन केले. ज्या शेतकऱ्यांकडे सुरक्षित ओलितातील आणि चांगल्या दर्जाचे सोयाबीन उत्पादन झाले आहे, त्यांनी स्वतःसाठी आवश्यक तेवढे बियाणे राखून ठेवावे. तसेच उर्वरित बियाणे परिसरातील इतर शेतकरी बांधवांना रास्त व वाजवी दरात उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून गावातच चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध होईल आणि शेतकरी बियाण्याबाबत स्वयंपूर्ण होतील.
बियाण्याची उगवण क्षमता टिकून राहण्यासाठी मळणी यंत्राचा आरपीएम ३५० ते ४०० पेक्षा कमी ठेवावा. वेगवेगळ्या वाणांचे बियाणे मळणी करताना एकमेकांत मिसळणार नाही, याची दक्षता घ्यावी. मळणी यंत्रातील आधीच्या पिकांचे अवशेष पूर्णपणे स्वच्छ करूनच मळणी करावी, सोयाबीन बियाणे उगवणीसाठी अत्यंत संवेदनशील असते. त्यामुळे वाहतूक व हाताळणी करताना आदळापट होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच बियाणे साठवताना पोत्यांची खूप मोठी थप्पी लावू नये.