सरकारच्या चुकीच्या धोरणांनी शेतकरी राजा हवालदिल
इस्लामपूर : वाळवा तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व माजी मंत्री जयंत पाटील समर्थक सरपंचांनी इस्लामपूर येथे भव्य बैल गाड्या व ट्रॅक्टर मोर्चा काढून वाळवा पंचायत समितीवर जोरदार धडक दिली. सरकारच्या चुकीच्या धोरणांनी गावांचा विकास ठप्प झाला असून, शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. राज्य सरकार व प्रशासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजना व शेतकऱ्यांच्या विविध अनुदानाचा निधी तातडीने द्यावा. अन्यथा सरकार आणि प्रशासनाच्या उरात धडकी भरेल, असा मोर्चा काढू, असा इशारा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे, नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील, इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजी पाटील, कामेरीचे सरपंच रणजित पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. येथील तहसील कचेरी चौकात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून बैल गाड्या व ट्रॅक्टर मोर्चाची सुरुवात झाली.
गांधी चौक, संभाजी चौक, आझाद चौक, झरी नाका मार्गे पंचायत समितीमध्ये मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेले भाजप आमदार बबनराव लोणीकर व राज्य सरकारचा प्रमुख पदाधिकऱ्यांनी चांगला समाचार घेतला.
या आंदोलनात राजारामबापू बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, उपाध्यक्ष माणिक पाटील, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, संचालक शैलेश पाटील, बाजार समितीचे सभापती संदीप पाटील, उपसभापती शिवाजी आटूगडे,आष्ट्याचे दिलीपराव वग्याणी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून मदत
शेतकरी आत्महत्या प्रकरणातील मृत शेतकऱ्याच्या संबंधित वारसाला वेळीच मदत मिळावी यासाठी राज्य शासनाकडून २० कोटीचा निधी सर्व विभागीय आयुक्तांना उपलब्ध करून दिला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.