File Photo : Ravindra Waikar
मुंबई : शिवेसना खासदार रवींद्र वायकर यांच्या कारला रविवारी रात्री अपघात झाल्याची घटना घडली. जोगेश्वरीच्या जवळ हा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. अपघातावेळी खासदार रवींद्र वायकर हेदेखील कारमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. पण, गाडीचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, या अपघातानंतर एकच चर्चा सुरु झाली आहे.
मुंबईत अपघाताचे सत्र सुरुच असल्याचे दिसत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली होती. त्यामध्ये एकाच मृत्यू झाला होता. त्यानंतर आता वायकर यांच्या गाडीला अपघात झाला. खासदार रवींद्र कारला अपघात झाल्याची घटना जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेश द्वाराजवळ घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक घटनास्थळी मोठ्या संख्येने पोहचले.
दरम्यान, या अपघातावेळी रवींद्र वायकर हे स्वत: गाडीत असल्याची माहिती मिळत आहे. तर अपघातातील गाडीचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सागंण्यात आले आहे. त्यामुळेच हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
रवींद्र वायकर सुखरूप
अपघातावेळी रवींद्र वायकर हे गाडीत होते. मात्र, ते सुखरूप आहेत. जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या गेट जवळ हा अपघात झाला आहे. या घटनेची माहीती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
खाजगी कार्यक्रमाहून परतत असताना अपघात
वायकर यांच्या गाडीला रविवारी रात्री एका खाजगी कार्यक्रमावरून परतत असताना अपघात झाल्याची घटना घडली. गोरेगाव एस.आर.पी.कॅम्प बिंबिसार कॉलनी जवळ मुख्यमार्गावर गाडी टर्न घेत असताना रवींद्र वायकर यांच्या गाडीच्या डाव्या बाजूला एका दुसऱ्या गाडीने धडक दिली. खासदार रवींद्र वायकर हे सुखरूप असून फक्त गाडीला डाव्या बाजूच्या गाडीचा दरवाजाला ठोकल्यामुळे गाडीचे नुकसान झाले आहे.