फोटो - सोशल मीडिया
नाशिक : नाशिकमध्ये रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. सरला बेटाचे महंत असलेल्या रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. हे वादग्रस्त विधान करणं त्यांना महागात पडणार आहे. या वक्तव्यानंतर नाशिकमध्ये तीव्र पडसाद पहायला मिळाले. यानंतर आता रामगिरी महाराज यांच्यावर तब्बल तीन जिल्ह्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोणकोणते गुन्हे झाले दाखल?
नाशिकमधील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचन सुरु होते. यावेळी त्यांनी बोलताना प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. याप्रकरणी रामगिरी महाराज यांच्यावर तीन जिल्ह्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिकमधील येवल्यात, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुरात, अहमदनगरमधील तोफखाना या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे त्यानंतर आता चौथा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो संगमनेरमध्येही दाखल करण्यात आला आहे. हिंदू मुस्लिम एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अहमद युसूफ मेमन यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता (बी.एन.एस)2023 चे कलम 192, 196, 197, 209, 302, 353 (2), 356 (3), 356 (2) प्रमाणे महंत रामगिरी महाराज उर्फ श्री गंगागिरी महाराज यांच्यावर नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे वादग्रस्त विधान करणे रामगिरी महाराजांना चांगलेच महागात पडले आहे.
रामगिरी महाराजांचे विधानावर स्पष्टीकरण
रामगिरी महराज यांच्या वक्तव्याचे पडसाद नाशिकसह राज्यांमध्ये उमटू लागले. त्यानंतर रामगिरी महाराजांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “तेढ निर्माण होण्यासारखे मी काही बोललो नाही. दीड तासांचे प्रवचन होते. त्यातील मोजका भाग एडिट करण्यात आला. भीष्माचार्य आणि धर्मराज याबाबतीत प्रवचन देत होतो. त्यात राजधर्म काय असत याचे उदाहरण देताना बोललो. हा मुद्दा मांडत असताना बांगलादेशचा विषय पुढे आला. हिंदुंवर अत्याचार होतात त्या विरोधात हिंदूंनी संघटित व्हावे, अत्याचाराच्या घटना वाईट आहेत. या विरोधात संघटित झाले पाहिजे, मजबूत राहीले पाहिजे, असे मी बोललो. कोणाचा द्वेष मत्सर करायचा नाही. कोणाला त्रास द्यायचा नाही. पण कोणी देत असेल तर सहन करायचे नाही. आम्ही जो बोललो ते ग्रंथात लिहिले आहे. वेगळे काही बोललो नाही. आम्ही शांतताप्रिय आहोत,” असे स्पष्टीकरण रामगिरी महाराजांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत केले.