Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट
गिधाडे ही निसर्गातील महत्त्वाची सफाई व्यवस्था मानली जातात. एखादे जनावर मृत पडल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात गिधाडे त्याचे मांस फस्त करतात. काही वेळात केवळ सांगाडा शिल्लक राहतो. त्यामुळे मृत जनावरांची नैसर्गिकरीत्या विल्हेवाट लागते. याच कारणामुळे गिधाडांना ‘निसर्गाचे सफाई कामगार’ म्हटले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विविध संसर्गजन्य आजारांमुळे गिधाडांची संख्या घटत आहे. त्यातच भूकबळीची भर पडली आहे. अन्नाची उपलब्धता कमी होणे, आजारांचा वाढता प्रादुर्भाव आणि संवर्धनासाठी अपुरे प्रयत्न यामुळे गिधाडांसमोरील संकट अधिक गडद झाले आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
नियमित होणाऱ्या नोंदींवरून राज्यात सध्या सुमारे १०० गिधाडेच उरली असल्याचे स्पष्ट होते. राज्याच्या सीमावर्ती भागातील गिधाडे अन्नाच्या शोधात इकडून-तिकडे जाणे-येणे करतात. राज्यात गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक गिधाडे आढळतात. चंद्रपूरसह कोकणातही गिधाडांची नोंद झाली आहे. मात्र, राज्यातील इतर भागांत गिधाडांची संख्या वाढविण्यासाठी अपेक्षित प्रवत्न होताना दिसत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
गडचिरोलीतील संकटग्रस्त गिधाडांच्या मृत्यूमध्ये पक्ष्यांना होणाऱ्या मलेरियाचा मोठा वाटा असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. चंद्रपूर-गडचिरोलीच्या घनदाट जंगलात पक्षीतज्ज्ञ डॉ. अजय पोहरकर यांच्या नेतृत्वाखाली गिधाडांच्या स्थितीचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात गिधाडांच्या मृत्यूमागील विविध कारणांचा वेध घेण्यात आला. राज्यात प्रामुख्याने पांढऱ्या पाठीची, लांब चोचीची आणि पातळ चोचीची गिधाडे आढळतात. मात्र, या तिन्ही प्रजातींची संख्या कमालीची घटली आहे. गिधाडांचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता त्यांच्या अधिवासाचे संरक्षण, अन्नाची उपलब्धता आणि आजारांपासून संरक्षण यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.






