Chandrapur News: परवानगी नाही, तरी व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू? चंद्रपुरात नेमकं चाललंय काय?
अकोल्यात भीषण पाणीटंचाई; टँकर लॉबी सक्रिय, घरगुती वापरापासून ते बांधकामापर्यंत मनमानी दर
बजाज पॉलिटेक्निकसमोरील जागेवर एका कापड व्यापाऱ्याकडून भव्य व्यापारी संकुल उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. संबंधित व्यापाऱ्याने जागेचे चार भाग करण्यासाठी अर्ज केला असून, बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे ऑनलाइन अर्जही सादर केला आहे. मात्र, या अर्जावर अद्याप निर्णय झालेला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे बांधकामाला अधिकृत मंजुरी मिळाली नसताना प्रत्यक्ष काम सुरू कसे झाले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
बांधकामाबाबत तक्रार झाल्यानंतर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन काम थांबविण्याचे तोंडी निर्देश दिल्याचे सांगितले जाते. मात्र, या निर्देशांनंतरही बांधकाम सुरू असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने केवळ तोंडी सूचना देण्याऐवजी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून नियमांनुसार पुढील कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. महापौर आणि उपमहापौर यांच्या प्रभागातच हा प्रकार घडत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा सुरू झाली आहे. संबंधित बांधकामाची अधिकृत परवानगी, अर्जाची सद्यस्थिती आणि प्रत्यक्ष कामाची पाहणी करून महापालिका प्रशासन काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बांधकामाला अद्याप परवानगी देण्यात आली नाही, या प्रकरणाची फाइल नगररचना विभागात प्रलंबित आहे. संबंधितांवर कोणती कारवाई करायची, याचा निर्णय महापालिकेतील संबंधित अधिकारी घेतील,- राहुल भोवर, नगररचनाकार, चंद्रपूर महापालिका
संबंधित व्यापाऱ्याने परवानगी न घेताच बांधकाम सुरू केले. सदर प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली असून बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले आहे. सध्या बांधकाम सुरू नाही.- संगीता खांडेकर, महापौर, चंद्रपूर






