Chandrapur News: चंद्रपुरात वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा; 19 हजारांहून अधिक जणांवर कारवाई
Raigad News: महाडकरांना अखेर मोठा दिलासा! पाणीटंचाई दूर, नियमित पाणीपुरवठा पूर्ववत
जिल्ह्यातील वाढत्या अपघाताच्या संख्येला आळा घालण्याच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश वाहतूक पोलिस निरीक्षक अमोल बारापात्रे यांना दिले आहे. त्यानुसार वाहतूक पोलिसांचे पथक चौका-चौकात उभे राहून उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरु केली. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, डोक्यावर हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्या चालकांची संख्या सर्वाधिक आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
जुलै महिन्यात विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या ४ हजार ४२७ चालकांवर कारवाई करत सर्वाधिक ४१ लाख २६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर दुचाकीवर तिघे बसून (ट्रिपल सीट) धोकादायक प्रवास करणाऱ्या १ हजार ७०७ चालकांकडून १७ लाख ५ हजार रुपये दंडापोटी वसूल करण्यात आले. शहरातील मुख्य रस्ते व चौकात अस्ताव्यस्त वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या २ हजार ९१३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत २४ लाख ४८ हजार रुपये दंड आकारण्यात आला. तसेच वाहन चालवताना फोनवर बोलणाऱ्या ९१६ जणांना १० लाख ९९ हजार, तर सीटबेल्ट न वापरणाऱ्या २०६ चारचाकी चालकांना ९ लाख ६ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
दारूच्या नशेत वाहन चालवून स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या ४४५ तळीरामांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत कडक कारवाई करण्यात आली. याशिवाय अत्यंत धोकादायक पद्धतीने विरुद्ध दिशेने (राँग साईड) वाहन चालवणाऱ्या ५२ चालकांवरही कारवाई करण्यात आली आहे. हे दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने या सर्व ४९७ केसेस दंडासाठी थेट न्यायालयात वर्ग करण्यात आल्या आहेत.
शहरातील वाढते अपघात रोखणे आणि वाहतुकीला योग्य शिस्त लावणे हाच या धडक मोहिमेमागचा मुख्य उद्देश आहे. दंडात्मक कारवाई करणे हा पोलिसांचा हेतू नसून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे हा संदेश देणे आहे. विनाहेल्मेट प्रवास, ड्रंक अँड ड्राईव्ह आणि राँग साईड वाहन चालवणे हे थेट जीवावर बेतू शकते, त्यामुळे चालकांनी दंडाच्या भीतीपोटी नव्हे, तर स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी नियमांचे तंतोतंत पालन करावे. – अमोल बारापात्रे, वाहतूक पोलिस निरीक्षक,
चंद्रपूर






