Chandrapur News: मतदार यादी पुनरीक्षणाला वेग; जिल्ह्यात ९९.६९ टक्के मतदारांचे डिजीटायझेशन पूर्ण
भारत निवडणूक आयोगाने एसआयआर कार्यक्रमासाठी १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्या मतदारांनी अद्याप गणना प्रपत्र भरून जमा केलेले नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे ते १७ऑगस्टपर्यंत जमा करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २०७६ बीएलओ नियुक्त करण्यात आले असून, त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय कामाचा आढावा घेतला असता, ७०-राजुरा, ७२-बल्लारपूर, ७३-ब्रह्मपुरी आणि ७४-चिमूर या चार मतदारसंघांमध्ये १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर ७५ वरोरा मतदारसंघात ९९.८१ टक्के आणि ७१-चंद्रपूर मतदारसंघात ९८.६३ टक्के काम पूर्ण झाले आहे.
एसआयआर मोहिमेंतर्गत मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. ज्या मतदारांनी अद्याप गणना प्रपत्र जमा केलेले नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ते १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत संबंधित बीएलओकडे सादर करावे. तसेच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या बूथस्तरीय प्रतिनिधींनी (बीएलए) या प्रक्रियेत सहकार्य करावे. त्रुटीरहित आणि अद्ययावत मतदार यादी तयार करण्यासाठी नागरिकांनी निवडणूक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले.






