Chandrapur News: कॅशबुक, पासबुक, चेकबुकसह कागदपत्रे बाहेर; खडसंगी ग्रामपंचायतीत नेमकं काय घडलं? ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी
ग्रामस्थांनी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतली. याबाबत ग्रामपंचायत चपराशी कृष्णा सातपसे यांना विचारणा केली असता, ग्रामपंचायत सचिवांच्या सांगण्यावरून कागदपत्रे बाहेर काढत असल्याचे त्यांनी सांगितल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तर ग्रामपंचायत अधिकारी कवडू तराळे यांनी मंगळवारी होणाऱ्या ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर कागदपत्रांच्या झेरॉक्ससाठी ती बाहेर पाठविण्यात येत असल्याचे सांगितल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. (फोटो सौजन्य – AI Created)
मात्र, सुट्टीच्या दिवशी आणि मागील खिडकीतूनच कागदपत्रे का नेण्यात आली? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. या प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून कागदपत्रे बाहेर नेण्यामागील कारण स्पष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली. याप्रकरणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, संवर्ग विकास अधिकारी आणि चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
कॅशबुक, पाणीपुरवठा व सामान्य फंडाची नोंदवही, १५ वा वित्त आयोगाचे रजिस्टर, साठा रजिस्टर, कार्यवाही अहवाल, व्हाउचर फाईल, एमआरजीएस कॅशबुक, पासबुक, चेकबुक, एमबीसह विविध शासकीय कागदपत्रे.
कागदपत्रे बाहेर नेण्यामागील कारण विचारण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत चपराशी सातपसे यांच्याकडे विचारणा केली. ग्रामस्थांच्या दाव्यानुसार, सचिवांच्या सांगण्यावरून कागदपत्रे बाहेर काढत असल्याचे त्यांनी सांगितले. तर ग्रामपंचायत अधिकारी तराळे यांनी मंगळवारच्या विशेष ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर कागदपत्रांच्या झेरॉक्ससाठी ती बाहेर पाठविण्यात येत असल्याचे सांगितल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
मंगळवारी ग्रामसभा असताना सुट्टीच्या दिवशी मागील खिडकीतून कागदपत्रे बाहेर नेण्यात आली. या प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच खडसंगी येथील क्रीडांगणाच्या कामाची चौकशी प्रशासन कधी करणार? – राजू गेडाम, ग्रामस्थ आंदोलक
खडसंगी ग्रामपंचायतीतील आंदोलन, विशेष ग्रामसभेची तयारी आणि त्यापूर्वी कागदपत्रे बाहेर नेल्याच्या आरोपामुळे गावातील वातावरण तापले आहे. कागदपत्रे झेरॉक्ससाठीच नेण्यात आली होती की या प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाले, याचा उलगडा चौकशीतूनच होणार आहे. मंगळवारच्च्या विशेष ग्रामसभेपूर्वी प्रशासन याचाबत स्पष्ट भूमिका मांडणार का? याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.
मंगळवारी ग्रामसभा असल्याने काही महत्त्वाच्या कागदपत्रांची झेरॉक्स काढणे आवश्यक होते. माझ्या आईची तब्येत बरी नसल्यामुळे मला ग्रामपंचायत कार्यालयात येण्यास उशीर होणार होता. त्यामुळे कागदपत्रांची झेरॉक्स काढण्यासाठी मीच चपराश्याला सांगितले होते. ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन सुरू असल्याने चपराश्याने भीतीपोटी मागील खिडकीतून कागदपत्रे बाहेर काढली. कागदपत्रे झेरॉक्स काढण्यासाठीच नेण्यात आली होती. यामागे कोणताही गैाकार करण्याचा हेतू नव्हता. – कवडू तरारे, ग्रामपंचायत अधिकारी खडसगी






