Chandrapur News: ताडोबातील पारंपरिक रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त; पारंपरिक रस्ता सुरू करण्यासाठी वन विभागाविरोधात आंदोलन
Wardha News : पाऊस गायब, जलाशयही अर्धवट! वर्धा जिल्ह्यावर जलसंकटाचे सावट
कारवा येथील ग्रामस्थ मोहलीमार्गे चंद्रपूरकडे ये-जा करण्यासाठी या पारंपरिक मार्गाचा नियमित वापर करतात. मात्र, वन विभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता हा मार्ग बंद केल्याने नागरिकांना आता शिवणीमार्गे सुमारे १३ किलोमीटरचा अतिरिक्त वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे वेळ, इंधन व आर्थिक खर्च वाढला असून, विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
या प्रश्नाकडे वनप्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी १४ जुलै रोजी ताडोबाच्या उपसंचालकांना लेखी निवेदन दिले होते. मात्र, त्यावर ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शुक्रवारी रात्री गावबैठक घेऊन आंदोलनाचा निर्णय घेतला.
कारवा-मोहली-खुटवंडा-झरी-पेठ तसेच मोहली गेटमार्गे चंद्रपूरकडे जाणारा पारंपरिक मार्ग तातडीने पूर्ववत सुरू करावा, अशी ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे. वन विभागाच्या विकास व संवर्धनाच्या कामांमध्ये स्थानिक बेरोजगार तरुणांना प्राधान्य देऊन रोटेशन पद्धतीने रोजगार उपलब्ध करून द्यावा. तसेच कोअर क्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशुधनाचे नुकसान झाल्यास कोणतीही टाळाटाळ न करता नुकसानग्रस्तांना तत्काळ व योग्य भरपाई द्यावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यटनातून शासनाला मोठा महसूल मिळत असताना जंगलाच्या सीमेवर राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनाच दळणवळणासाठी अतिरिक्त १३ किलोमीटरचा फेरा मारावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. पारंपरिक मार्ग पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व लवकुश पुसाम, विनोद मडावी, किष्णा लेनगुरे, चरनदास मानकर आणि सुरेश आदे यांनी केले. आंदोलनात कारवा परिसरातील महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
ग्रामस्थांच्या सर्व मागण्यांची सविस्तर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने आली पाठवण्यात असून यावर लवकरच वरिष्ठ स्तरावरून नियमांतर्गत तोडगा काढला जाईल. – विनोद जांभुळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, अंधारी व्याघ्र प्रकल्प, कारवा






