फोटो सौजन्य - Social Media
उद्योगांच्या गरजांनुसार रोजगाराभिमुख कौशल्ये देण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमांना’ मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र या अभ्यासक्रमांत प्रवेश घेणाऱ्यांमध्ये आयटीआयमध्ये सध्या शिकणारे किंवा आयटीआय पूर्ण केलेले विद्यार्थीच मोठ्या प्रमाणात असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे एकाच ट्रेडचे पुन्हा प्रशिक्षण देण्याचा, म्हणजेच ‘दुहेरी शिक्षणाचा’ प्रकार वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
या अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम योजनेचा प्रारंभ मोठ्या गाजावाजात करण्यात आला. या अभ्यासक्रमांसाठी दरमहा एक ते पाच हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले असून, २५ टक्के जागा संबंधित संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी आणि उर्वरित जागा बाह्य उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पात्रतेमध्ये आयटीआयचे विद्यमान व उत्तीर्ण विद्यार्थी, तसेच दहावी, बारावी, पदविका किंवा पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र याच निकषांचा फायदा घेत आधीच उच्च स्तरावरील संबंधित व्यवसायात प्रशिक्षण घेतलेले, शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेले किंवा सध्या आयटीआयमध्ये शिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी कमी स्तरावरील व्यवसायातील अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी कौशल्य उन्नतीऐवजी अनावश्यक व पुनरावृत्तीचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे वास्तव समोर येत आहे.
छत्रपती संभाजीनगर, नांदेड यांसारख्या जिल्ह्यांमध्ये या अभ्यासक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रवेश मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ९,४४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, त्यापैकी ३,७७९ विद्यार्थी आयटीआयमधील तर ५,५७४ विद्यार्थी बाह्य उमेदवार आहेत. या आकडेवारीवरून आयटीआय विद्यार्थ्यांचे प्राबल्य स्पष्टपणे दिसून येते. इलेक्ट्रिशियन, सीएनसी ऑपरेटर, वेल्डिंग, रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनिंग, सोलार पीव्ही इन्स्टॉलेशन यांसारखे ट्रेड आयटीआयमध्ये एक ते दोन वर्षांच्या कालावधीत सविस्तरपणे शिकवले जातात. मात्र हेच ट्रेड अल्पमुदतीच्या स्वरूपात पुन्हा सुरू करण्यात आल्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील प्राचार्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, यामुळे आयटीआय शिक्षणाचे महत्त्व कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या योजनेचा मूळ उद्देश शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करूनही रोजगार न मिळालेल्या, कौशल्यविरहित युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्याचा होता. मात्र प्रत्यक्षात आधीच प्रशिक्षण घेतलेले युवक या अभ्यासक्रमांत मोठ्या प्रमाणात प्रवेश घेत असल्याने योजनेचा मूळ हेतू धूसर होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भविष्यात पात्रतेचे निकष अधिक स्पष्ट करून, खऱ्या अर्थाने गरजू युवकांपर्यंत ही योजना पोहोचविण्याची गरज व्यक्त होत आहे.






