'जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना'; छगन भुजबळांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आलेलं नाही. यावर छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्या पार्श्वभूमीवर नाराज छगन भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावळे पत्रकारांनी विचारलं की तुम्ही आता नागपूरमधील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार नाही का? पक्षाने डावलल्यानंतर तुमची आता पुढची भूमिका काय असेल? यावर भुजबळ म्हणाले की, “आता बघू… जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”.
छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर आक्रमक झालेले भुजबळ समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. शहरातील राष्ट्रवादी भवनसमोर टायर पेटवून भुजबळ समर्थकांनी पक्षाध्यक्ष अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केली. या पार्श्वभूमीवर नाराज भुजबळ नाशिकला परतले असून, आज, त्यांनी आपली भूमिका मांडली.
फडणवीस आणि महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीमधील अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं आहे. यापैकी सर्वाधिक चर्चा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची. कारण त्यांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली असून पक्षातील काही नेत्यांवर जाहीरपणे टीका देखील केली आहे. भुजबळ वेगळी राजकीय भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. अशातच शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भुजबळांच्या नाराजीवर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात दाखल झाले आहेत. दुपारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांनी छगन भुजबळ वेगळी राजकीय भूमिका घेत तुमच्याकडे परत आले तर तुम्ही त्यांचं स्वागत कराल का? यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “ते काही बोलले तर मी त्यावर उत्तर देईन, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “भुजबळांबद्दल फार वाईट वाटलं. अशा अनेकांबद्दल मला आतून वाईट वाटतंय. हे लोक एका अपेक्षेने तिकडे गेले होते. अशा सर्वांबद्दल मी सहानुभूती व्यक्त करतो. भुजबळांशी नेहमी बोलणं होतं असतं. ते बऱ्याचदा माझ्याशी बोलतात”, असा दावा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला होता. त्यानंतर नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी भुजबळांना उद्धव ठाकरे यांच्या दाव्यावर विचारलं असता ते म्हणाले, “होय, मी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतो, संपर्कात असतो. मी शरद पवार यांच्याबरोबर देखील बोलत असतो. १२ डिसेंबरला मी त्यांची भेट घेतली होती. मी सुप्रिया सुळेंच्याही संपर्कात असतो. त्यांना मेसेज करतो, शुभेच्छा पाठवतो. त्या देखील त्यावर प्रतिक्रिया देत असतात. मी या सगळ्यांशी बोलतो, मग काय झालं? आपण ज्यांच्याबरोबर काम केलंय त्यांच्या संपर्कात असतो. विशिष्ट प्रसंगी एकमेकांना शुभेच्छांची देवाणघेवाण होत असते, असं त्यांनी म्हटलं आहे.