'जय पवारांनी ट्विट केलेला व्हिडिओ अजितदादांच्या विमानातील नाही'; छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले...
नागपूर : राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या विमान अपघातानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी काही दिवसांपूर्वी विमानातील एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यावर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी विधान केले आहे.
छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना विविध विधानं केली. जय पवारांच्या व्हिडिओवर ते म्हणाले, तो व्हिडिओ अजितदादांच्या विमानातील नाही. त्या सीटवर ते असते तर ठार झाले असते. पायलटच्या सीटवर फक्त पायलटच बसू शकतो. मालक झोपला असेल तर तो निष्काळजीपणा आहे. तसेच मी घटनास्थळी गेलो होतो; विमान झाडावर आदळले नाही. तिथे कुणीही तसे सांगितले नाही. विमान जर झाडावर आदळले असते तर झाडाचे नुकसान झाले असते.
याशिवाय, सीसीटीव्ही फुटेज योग्य आहे. पहिल्यांदा लँड करताना विमान पुन्हा वर गेले. दुसऱ्यांदा येताना विमान कललेले दिसते. सरळ किंवा कंट्रोल करण्यास वेळ मिळाला नसेल. 10 हजार फुटांवर सुधारण्याची संधी असते. जोरात लँडिंगचा प्रयत्न होत होता. DGCA जे सांगत आहे, त्याची सखोल चौकशी होईल.
अनेकांना बसतोय युद्धाचा फटका
सध्या इराणवर हल्ले केले जात आहेत. त्याला इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. यावर भुजबळ म्हणाले, विमान आणि जहाज सेवा बंद झाल्यास प्रवासी अडकतात. विद्यार्थी अडकले आहेत. तेलाच्या किमती वाढू शकतात. कांद्यासह भाजीपाला निर्यातीवर परिणाम होईल. हा केवळ एका घटकाचा प्रश्न नाही. सरकार मार्ग काढत आहे. गल्फ देशांत कांदे, बटाटे व मसाले जातात; सेवा बंद असल्याने फटका बसणार आहे.
हे देखील वाचा : राजकीय धुलवड! ठाकरे गटाला मोठा धक्का; उन्मेष पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश






