आमदार संजय शिरसाट (फोटो- ट्विटर)
गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेला पाऊस बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार होताना दिसत आहे. त्यातच जळगावात मुसळधार पाऊस झाला आहे. शहरासह जिल्हाभरात पावसाचे अधुनमधून झोडपणे सुरूच आहे. यामुळे शेतकरी आणि शेतीनिर्भर घटकामध्धाये भीतीचे वातावरण आहे. शहरात ठिकठिकाणी पाणी साठले आहे. श्रावणसरींमुळे जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्प भरले असून, शेती कामांना ब्रेक लागला आहे. दरम्यान शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर देखील त्यांनी निशाणा साधला आहे.
राज्यभरात पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत बोलताना संजय शिरसाट म्हणाले, ”गेल्या आठ दिवसांपासून मराठवाड्यात पाऊस कोसळत आहेत, त्यामुळं अनेक धरण भरली आहेत. पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मिटला आहे. मात्र जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी शिरले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तातडीने आवश्यक पावले उचलली आहेत. सर्व विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावे, पण जाऊन स्टंटबाजी करू नये. कालचा आदित्य ठाकरे यांचा दौरा म्हणजे केवळ स्टंटबाजी आहे.”
पुढे बोलताना आमदार संजय शिरसाट म्हणाले , ”उबाठा गटाला कसे संपवायचे याबातची पद्धतशीर आखणी शरद पवारांनी केली आहे. अगोदर पृथ्वीराज चव्हाण यांना आणि त्यानंतर नाना पटोले यांना बोलायला लावले. त्यानंतर शरद पवार यांचं वक्तव्य जाणीवपूर्वक केल्यासारखं वाटत. मविआमध्ये जी बिघाडी होणार आहे त्याची सुरूवात काल पवारांनी केली आहे. बोलायचे एक आणि करायचे एक अशी त्यांची कृती असते. मविआ उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारत नाही हे संकेत काल मिळाले आहेत.महाविकास आघाडीला दंगली घडवायच्या आहेत.”
उद्धव ठाकरे (फोटो- ट्विटर)
तसेच लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना शिरसाट म्हणाले, ” लाडकी बहीण योजनेमुळे कोणताही निधी थांबवला नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीची संकल्पना आहे. मात्र कुणीही योजनेचे नाव बदलू नये. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हेच या योजनेचे नाव आहे. शक्ती कायदा विधानसभेत पारित झाला आहे आणि तो संमतीसाठी राष्ट्रपती यांच्याकडे पाठवला आहे. त्यासंदर्भात काल राष्ट्रपती यांच्याशी चर्चा झाली आहे. पुढील आठ दिवसांत तसा निर्णय जाहीर देखील होऊ शकतो.
आज सांगलीत झालेल्या डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात उद्धव ठाकरे गेले नाहीत. त्यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, ”उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा कळाली आहे. त्यांना कार्यक्रमात कोपऱ्याची जागा मिळेल,अपमान होईल असे वाटल्याने त्यांनी कार्यक्रमात जाणे टाळले. तीन दिवस दिल्लीत बसून देखील काही मिळालं नसल्याने उद्धव ठाकरे यांनी त्या कार्यक्रमाला जाणं टाळलं असावे.”