पंतप्रधान नरेंद्र मोदी (फोटो- यूट्यूब)
छत्रपती संभाजीनगर: आज महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती संभाजीनगर येथे प्रचारसभा घेतली. राज्यात विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. २० तारखेला मतदान होणार आहे. तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. राज्यभरात सर्वत्र महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रचारसभा सुरू आहेत. दरम्यान प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. विधानसभा जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार प्रयत्न करत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे.
छत्रपती संभाजीनगरमधून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ” धर्मवीर संभाजी महाराजांवर नितांत प्रेम करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या सर्वांना माझा नमस्कार. एका बाजूला संभाजी महाराजांना मानणारे आहेत. तर दुसरीकडे औरंगजेबाचे गुणगान गाणारे लोक आहेत. या शहराला संभाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती हे संपूर्ण महराष्ट्राला माहिती आहे. ”
पुढे बोलताना मोदी म्हणाले, “महायुतीचे सरकार येताच या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे नामकरण केले. महायुती सरकारने तुमची इच्छा पूर्ण केली. आम्ही बाळसाहेब ठाकरेंची इच्छा पूर्ण केली आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर सगळ्यात जास्त त्रास हा कॉँग्रेस पक्षाला झाला होता. हा निर्णय बदलण्यासाठी यांची लोक कोर्टात देखील गेले होते. ज्यांना संभाजीमहाराजांच्या नावावर आपत्ती आहे, अशी लोक महाराष्ट्र आणि मराठी स्वाभिमानाच्या विरुद्ध उभे आहेत. ”
“महाराष्ट्राला भारताच्या विकसित व्हिजनचे नेतृत्व करायचे आहे. राज्यात आधुनिक सुविधा निर्माण होत आहेत. आज समृद्धी महामार्ग संभाजीनगर मधून जात आहे. महायुती आणि भाजप सरकार विकासाचे काम करत आहे. या भागात रेल्वेचे आधुनिकीकरण केले जात आहे. महायुती सरकार आल्यानंतर देशातील सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. येत्या काळामध्ये अनेक कंपन्या या ठिकाणी काम करणार आहेत. या ठिकाणी राज्यातील सर्वात मोठे औद्योगिक पार्क तयार केले जात आहे.
हाराष्ट्राच्या प्रगतीचे अनेक प्रकल्प महायुती सरकारने हाती घेतले आहेत. खरंतर ही कामं खूप पूर्वी व्हायला हवी होती. मात्र विदेशी मानसिकतेची गुलाम असलेल्या कॉंग्रेसने महाराष्ट्राच्या संस्कृतीशी असलेल्या द्वेषपूर्ण भावनेमुळे ही कामं कधी केलीच नाहीत. कॉंग्रेस आणि त्यांच्या सारख्या पक्षांनी नेहमी महाराष्ट्राचा अपमान केला. ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. पण कॉंग्रेस पक्ष हा औरंगजेबाचे गोडवे गात आले आहेत. हे लोक वीर सावरकर यांना शिव्या देतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याची महती गायला नको म्हणतात. तेव्हा त्यांच्या तोंडावर कुलूप लागतात. मी यांना आव्हान दिलं आहे की, त्यांच्या युवराजांच्या मुखातून वीर सावकर यांच्याबाबत एक भाषण त्यांनी करुन दाखवावे,” असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे