File Photo : Fish Market
मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून वातावरणात कमालीचा बदल होताना दिसत आहे. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण होत असल्याने, तर कधी पाऊस कधी उकाडा, यामुळे माशांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे अनेक बोटी गेल्या आठ दिवसांपासून समुद्रात जात नसल्याने माशांचा तुटवडा जाणवत आहे. पालघर जिल्ह्यातील सातपाटी, दांडी, अर्नाळा, डहाणू खाडी, उंबरगाव येथील समुद्रकिनाऱ्यावर मासे कमी मिळत असल्याने अनेक बोटी किनाऱ्यावर लागल्या आहेत.
मासेमारीसाठी सध्या खूप लांब जावे लागत असल्याने आणि मासे मिळत नसल्याने मच्छिमारांवर मोठे आर्थिक संकट ओढवलेले आहे. त्यामुळे अनेक जण खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे टाळत आहेत. त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसापासून खराब वातावरणामुळे अनेक ठिकाणी पाऊस व वातावरण बदल होत आहे. कधी थंडी पडते तर कधी कडक उन असल्याने मासे कमी झाले आहेत. समुद्रकिनाऱ्यावर बोटी लावून अनेक मच्छीमार जाळी दुरुस्तीच्या इतर कामांना देखील लागले आहेत.
सध्या समुद्रात खूप दूरवर जाऊन सुद्धा मासे मिळत नाहीत. त्यामुळे इंधन खर्च व मेहनत वाया जात असल्याने गेल्या आठ-दहा दिवसांपासून आम्ही मासेमारीला जात नसल्याचे एक मच्छिमाराने सांगितले.
अनेक ठिकाणी मासळी बाजार सुनेसुने
पालघर जिल्ह्यातील अनेक समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात मच्छी विक्रेते राहत असून गेल्या दहा ते बारा दिवसांपासून अनेक बोटी समुद्रात न गेल्याने अनेक मच्छी मार्केट, बाजार सुनेसुने झाले आहेत. तर खाडीतील लहान मासे सध्या विक्रीस दिसत आहेत. डहाणूमध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते. सध्या अनेक दिवसांपासून समुद्रकिनाऱ्यांवर बोटी उभ्या असून आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत.
अनेक व्यवहार झालेत बंद
या भागातील मासेमारीवर अनेक नागरिक आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यात बोटींवर काम करणारे खलाशी मासे वाहतूक करणारे, त्याचबरोबर माशांचा बाजार भरल्यानंतर छोट्या-मोठ्या टोपल्यांमध्ये गावोगावी मासे विक्री करणारे अशा अनेक लोकांचा रोजगार चालत असतो. पण गेल्या दहा दिवसापासून हे सगळे व्यवहार बंद झाले आहेत.
आमच्या हाताला आता काम नाही
गेल्या अनेक दिवसांपासून मासेमारी बंद असल्याने समुद्रात बोटी जात नसल्याने आम्हालाही काम नाही. त्यामुळे खराब झालेली, तुटलेली जाळी दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले आहे. खोल समुद्रात जाऊन इंधन व मेहनत वाया जाते मासे मोठ्या प्रमाणात लागत नसल्याने शक्यतो गेल्या काही दिवसापासून आम्ही समुद्रात जात नाहीत, असेही एक मच्छिमाराने सांगितले.