'मी डॉक्टर नाही, पण मोठं ऑपरेश केलंय'; एकनाथ शिंदेंनी डागली ठाकरेंवर तोफ
विधानसभा निवडणूक प्रचारात भाजप आणि कॉंग्रेस पेक्षा दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी यांच्यातच आरोप प्रत्योरोपांच्या फैरी झडत आहे. काल उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासण्यावरून राजकारण तापलं असताना आज एकनाथ शिंदे यांनी मी डॉक्टर नसलो तरी मोठं ऑपरेश केलं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘माझ्या दोन बाजूला दोन डॉक्टर बसले आहेत. मी डॉक्टर नसलो, तरी मोठं ऑपरेशन केलं आहे. डायरेक्ट टांगा पलटी घोडे फरार, दाताचे डॉक्टर असलेले डॉक्टर बालाजी किणीकर हे यंदा विरोधकांच्या तोंडातील दात घशात घालतील, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
‘ते म्हणतात पक्ष चोरला. चिन्ह चोरलं. बाप चोरला. अरे ते काय चोरायला खेळणं आहे का? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला. अंबरनाथ विधानसभेत किणीकर यांची ठाकरे गटाचे राजेश वानखेडे यांच्याशी थेट लढत आहे. त्यामुळे चुरशीचा सामना पहायला मिळण्याची शक्यता आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते प्रचारसभा घेत अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. अनेक बडे नेते हेलिकॉप्टर आणि कारने प्रचारसभांसाठी प्रवास करत आहेत. मात्र, हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडून झडती घेतली जात आहे. काल अधिकाऱ्यांनी बॅगांची झडती घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांचे व्हिडिओ काढले होते. तसेच महायुतीच्या नेत्यांच्या बॅगाही तपासा, असं आव्हान दिले होते. उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महायुतीवर टीका करण्यात येत होती.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी राज्यात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या राज्यभरातील विविध भागात प्रचारसभा होत आहेत. आज अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, उद्धव ठाकरे यांच्या बॅगाची झडती घेण्यात आली. उद्धव ठाकरे यांची दुसऱ्या दिवशीही झडती घेतल्यामुळे त्यांनी महायुती आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासणीवरून टीका केल्यानंतर राज ठाकरे यांनी ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना काही कळत नाही. ज्यांच्या हातातून कधी पैसे सुटले नाहीत. त्यांच्या हातातून आणखी काय निघणार. फारतफार कोमट पाणी सापडेल असा टोला त्यांनी लगावला होता. तर देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याही बॅग तपासल्या जातात. त्यांनी कधी या मुद्द्याचं राजकारण केलं नाही. मात्र, उद्धव ठाकरे आणि विरोधक जाणीपूर्वक या मुद्याचे राजकारण करत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.