फोटो सौजन्य - नवराष्ट्र टीम
आळंदी : आषाढी वारी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. आज आळंदीमधून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान करणार आहे. सकाळपासून अलंकापुरीमध्ये वैष्णवांचा मेळा जमला आहे. टाळ व मृदुंगाच्या गजरामध्ये अवघे आळंदी शहर दुमदुमले आहे. सर्वत्र हरि नामाचा जयघोष व ग्याणबा तुकाराम असा आवाज घुमत आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे लवकर प्रस्थान होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली आहे.
काल देहूनगरीमधून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले. यामध्ये राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार सामील झाल्या होत्या. त्यांनी वारकरी महिलांसोबत फेर धरत पालखीम सोहळ्यामध्ये उपस्थिती लावली होती. आज आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आळंदीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी भजन व किर्तनामध्ये सहभाग देखील घेतला आहे. गळ्यात केसरी उपरणे घेत व पगडी घालून मुख्यमंत्री शिंदे यांनी पालखी सोहळ्यामध्ये उपस्थितची लावली आहे. मंदिर संस्थान व वारकऱ्यांसोबत मुख्यमंत्री शिंदे अगदी साधेपणाने जमिनीवर बसलेले दिसून आले. सोशल मीडियावर त्यांचे हे फोटो व्हायरल देखील झाले आहेत.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मी संत ज्ञानेश्वर महाराजांना वंदन करतो. आज मला पांडुरंगाच्या कृपेने पालखी सोहळा पाहता आला त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी पाडुंरंगाला व ज्ञानेश्वर महाराजांना एक मागतो की माझा बळीराजा सुखी व्होवो दे. त्यांच्यावरची सर्व संकट व अनिष्ट दूर होऊ दे. महाराष्ट्राच्या जनतेला सुखी व आनंदाचे दिवस येऊ दे एवढीच माझी माऊलींच्या चरणी विनंती आहे. तसेच इंद्रायणी नदीचं प्रदुषण मुक्त करणार असून हे वचन मी दिलं आहे. त्याचे काम देखील सुरु झाले आहे.” असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदी भेटीवेळी व्यक्त केले.
अमोल कोल्हे देखील दाखल
त्याचबरोबर आळंदीमध्ये शिरुरचे खासदार अमोल कोल्हे देखील दाखल झाले आहे. संजीवन समाधीचे दर्शन घेत अमोल कोल्हे यांनी पालखी सोहळ्याला उपस्थिती लावली. गळ्यात वारकऱ्यांचे उपरणे व डोक्यावर टोपी घालून अमोल कोल्हे मंदिर परिसरामध्ये दिसून आले. पालखी सोहळ्यामुळे समाधी मंदिर परिसर सजवण्यात आलेला आहे. संपूर्ण मंदिराला आकर्षक फुलांची आरास व सजावट करण्यात आली आहे. मंदिरावर वैष्णवांचा महामेरु योगी ज्ञानेश्वर असे लिहिण्यात आले आहे. ही फुलांनी केलेली सजावट लक्षवेधी ठरत आहे. मंदिर परिसरामध्ये दिंडींसह वारकरी टाळ वाजत जयघोष करत आहेत. तसेच पावली करत आनंदोत्सव साजरा करत आहेत.