फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मुंबई : राज्य सरकारकडून अर्थसंकल्प प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. या अंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला प्रत्येकी दीड हजार रुपये देण्यात येणार आहेत. सामान्य लोकांना ही योजना अत्यंत आवडली असून अवघ्या काही दिवसांमध्ये याची लोकप्रियता वाढली आहे. यावरुन मात्र विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. सरकारी तिजोरीमधून मत मिळवण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका विरोधक करत आहे. दरम्यान, मनसेने राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेला पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. तसेच राज ठाकरे यांचे दौरे आता नियोजित केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
माध्यमांशी संवाद साधताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या माझी लाडकी बहीण योजनेला पाठिंबा दिला. ते म्हणाले, राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली ही एक चांगली योजना आहे. फक्त इम्प्लिमेंट करण्यात अजून योग्य पद्धतीने झाली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच रवींद्र वायकर यांना क्लीन चीट मिळाल्यानंतर संदीप देशपांडे यांनी खोचक टोला लगावल. संदीप देशपांडे म्हणाले, वायकर आता आनंदी असतील. कसा तपास केला आहे काय माहिती नाही. आम्हाला पण अशी कुठली मशीन मिळाली तर बरं होईल, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
याआधी मनसे नेत्याचे वादग्रस्त विधान
आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी योजनेला पाठिंबा दिला असला तरी दोन दिवसांपूर्वी एका मनसे नेत्याने वादग्रस्त विधान केले होते. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मुस्लीम महिलांना या योजनेचा लाभ मिळू नये या आशयाचे वक्तव्य केले होते. प्रकाश महाजन म्हणाले, राज्य सरकारने दोन बायका किंवा दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या महिलांना विशेषत: मुस्लीम महिलांना या योजनेचा फायदा देऊ नये, अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली.