छत्रपती संभाजीनगर– रामनवमीच्या आदल्या दिवशी म्हणजे (बुधवारी) रात्री किराडपूर परिसरात दोन गटांत मोठी वाद झाला. संभाजीनगर (Sambhaji nagar) नामांतरावरुन शहरात गेल्या काही काळापासून निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम अखेरीस बुधवारी रात्री पाहायला मिळाला. रामनवमीच्या तयारीसाठी युवक एकत्र जमा झालेले होते. या वादातून काही वेळात दंगल पेटल्याची माहिती देण्यात येते आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. मात्र अनियंत्रित झालेल्या जमावानं पोलिसांवरही (Police) हल्ला केल्याची माहिती आहे. पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करुन काही गाड्या जाळल्याचीही माहिती आहे. या दगडफेकीत दोन पोलिसांसह 6 जण जखमी झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरा सुरु झालेला हा प्रकार पहाटे 3.30 वाजेपर्यंत सुरु होता. दरम्यान, यानंतर पोलीस एक्शन मोडमध्ये आले असून, पोलिसांना कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या राड्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी (Chandrakant Khaire) या राड्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.
दंगलीमागे भाजपा-एमआयएमची मिलीभगत?
दरम्यान, ही दंगल घडवून आणली असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी (Chandrakant Khaire) केला आहे. तसेच पुढे बोलताना खैरे म्हणालेत की, “छत्रपती संभाजीनगर दंगलीमागे भाजपा आणि एमआयएमची मिलीभगत आहे”, यामुळं ऐन सणासुदीच्या तोंडावर दंगल घडवून आणली जात आहे. आज राम नवमी आहे, तर मुस्लीमांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे. त्यामुळं ही दंगल घडवून आणण्यास भाजपा व एमआयएम जबाबदार असल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तसेच इम्तियाज जलीलने नौटंकी करु नये असं देखील चंद्रकांत खैरेंनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
पोलिसांच्या कारवाईनंतर या परिसरात तणावपूर्ण शांतता असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान या सर्व घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. संभाजीनगरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. आता तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु काही लोकं याठिकाणी भडकाऊ प्रतिक्रिया देत असून, परिस्थिती आणखी चिघळली पाहिजे यासाठी प्रयत्न करत असल्याचे फडणवीस म्हणाले आहे.
शांतता पाळण्याचं पोलिसांचे आवाहन…
दरम्यान, संभाजीनगरमध्ये काल रात्री नागरिक व पोलिसांमध्ये झालेला हा राड्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच रामनवमीच्या दिवशी दंगल किंवा दोन गटात हाणामारी होऊ नये, यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनंगर शहरात पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावरील कोणत्याही धार्मिक भडकावू संदेशावर विश्वास ठेवू नका. किंवा त्याला बळी पडू नका, असं पोलीस आयुक्तांनी सर्वपक्षीयांना आवाहन केलं आहे. तसेच ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना शोधून अटक करणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे. तसेच अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं पोलीस म्हणालेत.
वादाचे कारण काय?
रामनवमीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. किराडपुऱ्यातही रामनवमीचा उत्साह होता. रात्री 11.30 च्या सुमारास किराडपुऱ्यातील राम मंदिराजवळ दोन गटांत वाद झाला. त्यातून बाचाबाची आणि शिविगाळ झआली. त्यानंतर घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर एका गटानं मंदिरावर दगडफेक करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. काही जण या गोंधळात मंदिरात गेले, त्यांच्यावरही हल्ला करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.