सौजन्य - सोशल मिडीया
चिंचवड : गेल्या काही दिवसांपासून सिलिंडरच्या स्फोटांच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या तिन्ही पेट्रोलियम कंपन्यांनी त्यांच्या घरगुती गॅस सिलिंडर धारकांसाठी केवायसी सक्तीची केली आहे. मात्र अनेक ग्राहक याबाबत अनभिज्ञच असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील २५ लाखांपैकी २५ टक्के ग्राहकांचे केवायसी पूर्ण झाले असून, यासाठी २५ जुलै अंतिम मुदत आहे. त्यामुळे आता घरगुती सिलिंडर धारक ‘गॅस’वर आहेत. केवायसी न केल्यास सवलतीच्या दरात सिलिंडर मिळणे अवघड होणार आहे.
सुमारे १९-२० लाख ग्राहकांचे केवायसी पूर्ण करणे इतक्या कमी दिवसात अशक्य आहे. केवायसी संबंधित वितरकाच्या कार्यालयात जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने थंब इम्प्रेशन किंवा छायाचित्र देऊन करावे लागणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या दोन्ही कंपन्यांचे मिळून सुमारे सहा लाख घरगुती गॅस सिलिंडरचे ग्राहक आहेत. पुणे परिसरात ही संख्या एकूण सुमारे २५ लाख आहे. या कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना केवायसी अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर वितरकांच्या कार्यालयांमध्ये सध्या केवायसी पूर्ततेसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.
ज्येष्ठांची गैरसोय
अनेक ज्येष्ठ नागरिकांची मुले परदेशात अथवा नोकरी किंवा व्यावसायानिमित्त परगावी असतात. काही जणांना तर चालताही येत नाही, परंतु गॅस जोड ज्येष्ठांच्या नावावर आहेत अशा नागरिकांसाठी संबंधित वितरकाकडील कर्मचारी घरी येतो आणि थंब इम्प्रेशन घेऊन केवायसी पूर्ण करतो. परंतु अनेकदा नेटवर्क नसल्याने अशा पद्धतीने केवायसी पूर्ण होण्याचे प्रमाण केवळ १० टक्के असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. तसेच वयोमानाप्रमाणे काही जणांचे थंब इम्प्रेशन व्यवस्थित होत नाही. अशा नागरिकांचे छायाचित्र घेऊन केवायसी पूर्ण करता येणार आहे.
गैर वापराला बसेल आळा
ऑल इंडिया एलपीजी डिस्ट्रिब्युटर अससोसिएशनचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रवीण खंडाळकर म्हणाले की, ” ज्या ज्येष्ठ नागरिकांना गॅस वितरकाच्या कार्यालयात जाणे शक्य नाही, त्यांच्याकडे वितरकाचा कर्मचारी घरी येईल. त्याच्याकडुन केवायसी पूर्ण करून घ्यावे. केवायसीमुळे एका व्यक्तीच्या नावावरील सिलिंडर जर दुसरी कोणीतरी व्यक्ती वापरत असेल, तर त्याला आळा बसू शकेल.
प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तसेच मोबाइल अँपच्या साहाय्याने वितरकाचा कर्मचारी घरी येऊन सिलिंडरच्या सुरक्षेचे नऊ निकष ग्राहकांकडून पूर्ण होतात कि नाही याचीही तपासणी करणार आहे. या अँपद्वारे तो कर्मचारी हि माहिती अपलोड करणार आहे. त्यासाठी कंपनीकडून कर्मचाऱ्याला प्रति ग्राहक ५० रुपये पेट्रोलियम कंपनीकडून देण्यात येणार आहेत.”
– एस. एन. पाटील, विभागीय विक्री प्रमुख, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन