संग्रहित फोटो
मुंबई : भोंदूबाबा अशोक खरातच्या इशानेश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने २०१८ साली १.५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. फडणवीसांच्या कार्यालयात त्यावेळी कार्यरत असणारे व आता म्हाडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचेही या बाबाशी अत्यंत जवळकीचे संबंध आहेत, अशी माहिती मिळत आहे. अशोक खरात प्रकरणात सरकारने प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि दोन डझन अधिकारी जेलमध्ये जातील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ X वर केलेल्या पोस्ट मध्ये म्हणतात की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही या भोंदू सोबतचे फोटो समोर आले आहेत. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचेही या भोंदू खरातशी अत्यंत जवळचे संबंध होते, त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पुजा केल्याची माहिती मिळत आहे. भोंदूबाबाचे कारनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सहा महिन्यांपासून माहित होते. पण त्यांच्या आजूबाजूचे लोक, मंत्रीमंडळातील सहकारी यांचे अशोक खरातशी संबंध असल्यानेच माहिती मिळूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही कारवाई केली नव्हती. पण त्यांच्या मित्रपक्षातील सहकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून तंत्र मंत्र व अघोरी पूजा केल्यानेच फडणवीसांनी भोंदूबाबा अशोक खरात विरोधात कारवाई केली. भोंदू बाबा अशोक खरातच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस आता मित्रपक्ष आणि स्वतःच्या पक्षातील हितशत्रूंना ब्लॅकमेल करत आहेत, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
हे सुद्धा वाचा : लालपरीचा होणार कायापालट! 2035 पर्यंत एसटी ताफा पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा निर्धार
अशोक खराताप्रमाणे भ्रष्टाचाराचीही विकृती
आमदार संजय गायकवाड यांच्याबद्दल बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आमदार गायकवाड ज्या विकासाच्या वल्गना करत आहेत, त्यांनी कोणत्या गावात किती पैसे खर्च केले याची श्वेतपत्रिका काढावी. सर्व कंत्राटे तर त्यांच्या घरात व नातेवाईकांकडेच आहेत. रेतीची अवैध कामे कोण करत आहे, मटक्याची दुकानेही त्यांचीच आहेत. ३५ कोटी रुपयांच्या कमिशनवर पाणी सोडले. सायकलवर फिरणाऱ्या कार्यकर्त्यांकडे फार्च्यूनर कार आली, असे ते सांगत आहेत, तर ते ज्यातून फिरतात ती कोट्यवधींची डिफेंडर कार कोठून आली हेही त्यांनी सांगावे. आमदार झाल्यापासून आतापर्यंत किती पटीने त्यांची संपत्ती कशी व किती वाढली हेही त्यांनी जाहीर करावे. निराधार लोकांना घरे बांधून देण्यासाठी २० एकर जमीन दान केली होती, त्याचे काय झाले हेही सांगावे. महाराष्ट्रात अशोक खरातची विकृती समोर आली तशीच भ्रष्टाचाराचीही विकृती समोर येत आहे हे चिंताजनक आहे असेही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.






