डोंबिवली : नंदू जोशी प्रकरणात काँग्रेसने आता पीडितेला पाठिंबा दिला आहे. पीडितेने नंदू जोशी यांना अटक करण्याची मागणी करीत गेल्या आठ दिवसांपासून मानपाडा पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणस्थळी आज काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, नवीन सिंह यांच्यासह शिष्टमंडळाने पीडितेची व पोलिसांची भेट घेतली. यावेळी या प्रकरणातील ‘भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांना तत्काळ अटक करा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल’ असा इशारा देण्यात आला आहे.
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांची मागणी
यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांनी पीडितेच्या तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल होतो गुन्हा दाखल केल्यानंतर साधी चौकशीसाठीसुद्धा बोलावले गेले नाही. भाजप मंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस काम करतात. पीडितेला न्याय देणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवले जाते हा कोणता न्याय? असा सवाल करीत यावरून भाजपची मानसिकता समजते या मानसिकतेविरोधात जर पोलिसांनी कारवाई केली नाही, तर काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात येईल. काँग्रेस अध्यक्ष नाना पटोलेदेखील या आंदोलनात सहभागी होतील, असा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिला आहे.
भाजप पदाधिकारी यांचे विरोधात विनयभंगाचा गुन्हा
एकंदरीतच भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांचे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध घडामोडी घडताना दिसल्या होत्या. भाजपचा मोर्चा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. शेखर बागडे यांची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेला सहकार्य न करण्याचा ठराव भाजपने पास केला होता. भाजपने यामध्ये शिवसेनेला अट टाकली होती की, जोपर्यंत पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली होत नाही, तोपर्यंत आम्ही शिवसेनेला सहकार्य करणार नाही. त्यामुळे भाजप-शिवसेना यांच्यात चांगलीच जुंपली असताना स्थानिक पातळीवर चांगलाच वाद रंगला होता.
शिवसेना-भाजप वादामध्ये कॉंग्रेसची उडी
त्यापाठोपाठ श्रीकांत शिंदे यांची राजीनाम्याची तयारी, शिवसेना भाजपमध्ये वादाची ठिणगी, भाजपकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्यावर मालमत्ता जमा केल्याचा आरोप, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीदेखील शेखर बागडे यांच्या चौकशीची केलेली मागणी, त्यातच आता काँग्रेसने पीडितेला पाठिंबा देत ‘आरोपीला अटक करा, अन्यथा आंदोलन छेडू’ असा इशारा पोलिसांना दिला आहे. एकंदरीतच या प्रकरणानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे आता भाजप-शिवसेना वादात आता कॉंग्रेसने उडी घेत राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मोठी उधळण येत्या काळात पाहायला मिळणार आहे.