फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अहमदनगर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय एका कार्यकर्त्यांने धुवून दिलेले दिसत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले असून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. महायुतीच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला असून पक्षामध्ये समानता नसल्याची टीका केली आहे. यावर आता नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.
तुम्ही जनतेला चिखलात फसवत आहात
नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत व्हायरल व्हिडिओवरुन टीका करणाऱ्यांना सुनावले. टीका करणाऱ्यांना सत्ताधारी नेत्यांवर निशाणा साधत नाना पटोले म्हणाले, “तरुण पिढीचं भविष्य बरबाद केलं जातंय, त्यावर लक्ष घाला. शेतकरी कर्जाच्या चिखलात फसलाय, त्यातून त्याला बाहेर आणा. शेतकऱ्यांच्या शेतात वीज देत नाहीत. महाराष्ट्राने मोदींना नाकारलं आहे. त्यामुळे इथं मोदी मोदी करून काहीही अर्थ राहणार नाही. तुम्ही प्रिपेड मीटर लावत आहात. प्रीपेड मीटर नको म्हणून अनेकांनी अर्ज केले आहेत. अनेकांनी आंदोलनेही केली आहेत. तरीही तुम्ही ऐकायला तयार नाही. तुम्ही जनतेला चिखलात फसवत आहात. तुम्ही महाराष्ट्रात हे थांबवलं पाहिजे,” असे उत्तर नाना पटोले यांनी दिले आहे.
नाना पटोलेंचे चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याने धुतले; व्हिडिओ तुफान व्हायरल
हरघर में नळ नाही ना नाहीतर
पुढे ते म्हणाले, “मी लोकांमधला आहे. हे दाखवण्यासाठी कोणत्याही प्रमाणपत्रांची गरज नाही. पैसे देऊन प्रचार करायची गरज नाही. कालची घटना मी लपवत नाहीय. कार्यकर्ता वरून पाणी ओतत होता. ‘हरघर में नळ’ नाही ना. नाहीतर मी नळाचं पाणी घेतलं असतं. मी शेतकरी आहे. मला चिखलाची सवय आहे. चिखल आहे म्हणून गजानन महाजारांच्या पालखीचे आशीर्वाद घेणार नाही असं नाही. मी राजा नाही. मी काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही”, असे स्पष्टीकरण देत नाना पटोले यांनी टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे