सौजन्य - नवराष्ट्र टीम
सपकाळ म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील दरे गावातील घरापासून हाकेच्या अंतरावर अंमली पदार्थांचे उत्पादन करणारा कारखाना सुरु होता. या प्रकरणात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही आरोपीला सोडून दिले. काही बंगाली आणि बांग्लादेशी कामगारांना अटक करून मुख्य सुत्रधाराला सोडून देण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असा आरोप सपकाळ यांनी केला आहे.
सपकाळ यांचे सत्ताधाऱ्यांना खालीलप्रमाणे सवाल
पश्चिम बंगाल व बांग्लादेशचे कामगार इतक्या दुर्गम ठिकाणी कोणाच्या मदतीने वास्तव्यास थांबले?
ज्या ठिकाणी ड्रग्स निर्मिती सुरु होती त्या इमारतीच्या मालकाकडून ओंकार दिघे याने एकनाथ शिंदेच्या पक्षाचे नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्या कामासाठी जागा वापरण्यास मागितली होती, हे स्पष्ट झाल्यावर ओंकार दिघे याला ड्रग्स निर्मिती स्थळावरच ताब्यात घेण्यात आले होते, परंतु त्याला कोणाच्या दबावामुळे सोडण्यात आले?
ओंकार दिघे हा सावळी गावात कधीपासून वास्तव्यास आहे?, कोणामुळे तो इकडे आला?
इतर जवळपास ४० कामगार या कामगारांसोबत काम करत होते त्यांच्याबाबत काय झालं ? त्यांना पळून जाण्यात कुणी मदत केली? पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली त्यांना सोडून दिले.
ज्याला एक दिवस आधी २ किलो MD ड्रग्स सह अटक केली तो विशाल मोरे अजित पवार गटाचा पुण्यातील विद्यार्थी संघटनेचा प्रमुख आहे, त्याचे ओंकार दिघे आणि प्रकाश शिंदे यांच्याशी काय संबंध आहेत?
प्रकाश शिंदे कारवाईच्या आदल्या रात्रीपर्यंत तेजस हॉटेलवर होते, रात्री विशाल शिंदे याला अटक झाल्यावर ते हॉटेलवरून कसे निघून गेले? त्यांना तिथून पळून जाण्यास कोणी मदत दिली.
पोलिसांनी तेजस हॉटेलची झाडाझडती का घेतली नाही पंचनामा केला की नाही? महाराष्ट्राला ड्रग्स च्या विळख्यात लोटणाऱ्या या गंभीर घटनेवर गृहमंत्री अजून गप्प का आहेत?
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तिथे जाऊन धाड घालेपर्यंत सातारा पोलिसांना यांची कल्पना नव्हती का? त्यांच्या आशिर्वादानेच हा कारखाना सुरु होता? की उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचे लोक हा कारखाना चालवत असल्याने कारवाई होतं नव्हती? जिथे साधा रस्ता नाही अशा दुर्गम भागात हे हॉटेल आणि ड्रग्सचा कारखाना एकाचवेळी सुरु झाले. कारखान्यात काम करणाऱ्यांचे जेवणही याच हॉटेलमधून जात होते. या हॉटेलचे मालक आणि अंमली पदार्थांचा कारखाना चालवणारे एकच आहेत अशी माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. त्याच्यावर कारवाई करू नये म्हणून उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्यातील एका खासदाराने पोलिसांवर दबाव आणला हे खरे आहे का?
विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “ड्रग्स बनवणे सोपे आहे” असे बेजबाबदार वक्तव्य केले. यावरून तरुणाईचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या विषाचा व्यापार रोखण्याबाबत ते गंभीर नाहीत हे स्पष्ट झाले आहे. एकीकडे बांगलादेशी घुसखोरांविरोधात ओरडणारे सत्ताधारी नेते बांग्लदेशींना आणून ड्रग्सच्या फॅक्टरी चालवत आहेत. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खिशात घातल्याचे वक्तव्य राजकीय पटलावर चर्चेत आहे. शाह यांच्या दबावामुळे या प्रकरणातील आरोपींना अटक होतं नाही का? याचा खुलासाही सरकारने करावा असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
निवडणूक आयोगावर सपकाळांचा निशाणा
निवडणूक आयोगाने आज निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली असली तरी निवडणूक याद्या, दुबार मतदार आणि प्रभाग रचनेबाबत आम्ही महत्त्वाचे पुराव्यासह, आक्षेप आणि हरकती नोंदवल्या होत्या. त्यावर आयोगाने काहीच कारवाई केली नाही. सत्ताधारी पक्षाचा पुण्यातील एक कार्यकर्ता उघडपणे वॉर्ड रचना करत असल्याचे समोर येऊनही आयोग गप्प का आहे? हे समजण्यापलीकडचे आहे. राज्यात माहापालिकांच्या निवडणुका होत आहेत पण त्या पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुका होणार नाहीत, हे आता स्पष्ट दिसत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.






