संग्रहित फोटो
महापालिकेचे सभागृह १४ मार्च २०२२ रोजी मध्यरात्री विसर्जित झाले आणि त्यानंतर निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र, या निवडणुका गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडल्या आहेत. महापालिकेवर सध्या प्रशासकराज आहे. आयुक्तच प्रशासकाची भूमिका निभावत आहेत. राज्यातील इतर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावरील सुनावणीत ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन १४ डिसेंबरला संपताच निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शहरातील निवडणूकपूर्व हालचालींना जोर आला आहे.
प्रशासक काळात पूर्वी मंजुरी मिळालेल्या तसेच पाठपुरावा केलेल्या अनेक कामांना गती मिळाली आहे. पूर्णत्वास गेलेल्या या प्रकल्पांचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यात सत्ताधारी भाजपने विशेष पुढाकार घेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात विविध विकास कामांच्या उद्घाटनाची तयारी केली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात येणार असून, शहराच्या मध्यवर्ती भागांसह विविध उपनगरांतील प्रकल्पांचा समावेश असलेल्या तब्बल ३ हजार कोटींपेक्षा अधिक प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यकम म्हणजे भाजपचे शक्तीप्रदर्शन मानले जात आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी महापालिका प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे.
या कामांचे होणार उद्घाटन
महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीतील अ आणि ब विंग, नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाची नवी इमारत, खराडी, चांदणी चौक व बाणेर येथील अग्निशामक केंद्रे, विविध सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, आपत्ती व्यवस्थापनासाठीचे इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर, जागतिक सायकल स्पर्धेसाठी केलेले ७५ किमीचे रोड नेटवर्क, समान पाणीपुरवठा योजनेतील पूर्णत्वास गेलेले ४० झोन, तसेच काही दवाखाने व आरोग्य केंद्रांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
या कामांचे होणार भूमीपूजन
कार्यक्रमात बिंदू माधव ठाकरे चौकातील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर, आचार्य आनंदऋषिजी महाराज (विद्यापीठ) चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन तसेच ग्रेड सेपरेटरचे भूमीपूजन, पाणीपुरवठ्याचे विविध प्रकल्प आणि वडगाव येथील जलशुद्धीकरण केंद्राचे भूमीपूजन अशा सुमारे ४०० ते ५०० कोटी रुपयांच्या नव्या कामांची मुहूर्तमेढही रोवली जाणार आहे.






