फोटो सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : राज्यामध्ये लवकरच आषाढी वारी सुरु आहे. वैष्णवांच्या या मेळ्यासाठी राज्यभरामध्ये जोरदार तयारी केली जात आहे. देहू आणि आळंदीमध्ये प्रस्थानाची तयारी सुरु असून रथ व पालखी सजवल्या जात आहेत. दरम्यान, राज्यामध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका देखील होणार आहेत. त्यामुळे अनेक राजकारणी वारीमध्ये सहभाग घेणार आहे. जेष्ठ नेते शरद पवार देखील वारीमध्ये सहभाग घेणार आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस नेते राहुल गांधी देखील वारीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
राहुल गांधींना वारीत सामील होण्याची विनंती
महाराष्ट्रातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना आषाढी वारीमध्ये सहभागी होण्याची विनंती केली आहे. राज्यातील वारकरी संप्रदायासाठी हा अनोखा सोहळा असल्याने त्यामध्ये सामील व्हावे अशी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेससाठी ही महत्त्वाची संधी असणार आहे. त्यामुळे पदयात्रेनंतर राहुल गांधी यांनी पायी आषाढी वारीमध्ये सहभागी होण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता राहुल गांधी खरोखरच पंढरीच्या वारीत चालणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राहुल गांधी हे 13 किंवा 14 जुलै रोजी पंढरपुरात येऊन विठुरायाचे दर्शन घेणार आहेत. याबाबत काँग्रेसच्या एका जेष्ठ नेत्याने दुजोरा देखील दिला आहे. दर्शनाबरोबर वारीमध्ये सहभागी होण्याची विनंती करण्यात येणार आहे.
शरद पवार पायी वारीत सहभागी होणार
दरवर्षी आषाढी पालखी सोहळ्यात ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम राबवण्यात येतो. यामध्ये साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत यांचा या वारीत सहभाग असतो. यंदा शरद पवार या वारीत सहभागी होणार आहेत. बारामती ते इंदापूरच्या सणसरपर्यंतचे तब्बल 17 किलोमीटरचे अंतर शरद पवार पायी चालणार आहेत. संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात 7 जुलै रोजी ही मंडळी बारामती ते सणसर हे अंतर चालणार आहेत. शरद पवार यांच्यासोबत राहुल गांधी देखील वारीमध्ये सहभागी झाले तर महाविकास आघाडीसाठी हे मोठे शक्तीप्रदर्शन ठरु शकते.