पुणे : गेल्या महिन्यापासून पालेभाज्यांचे दर वधारले आहेत. अनेक घरांमध्ये ताटातून मेथी, कोंथिबीर बेदखल झाल्याचं दिसत आहे. दरम्यान काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 20 ते 30 रुपयांना मिळणारी जुडी कोथिंबीर दोनशे रुपयांहून जास्त किमतीने विकली जात आहे. सगळ्याच भाज्यांना चव देणारी कोथिंबीर आता न परवडणारी झाल्याने गृहिणींचे घरातील बजेट कोलमडले आहे.
मिळालेल्या भावमुळे शेतकरी आनंदी असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत काल रात्री झालेल्या लिलावात चक्क कोथिंबिरीला प्रतिजुडी 450 रुपये भाव मिळाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक कमी झाल्यामुळे कोथिंबीरीला एवढा भाव मिळाला आहे.
कोथिंबीरीसह इतरही पालेभाज्यांच्या दरात 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पालेभाज्यांची आवक घटल्याने दर वाढल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. यंदा अनेक भागांमध्ये चांगला पाऊस पडला. नाशिकलाही गेल्या महिनाभरात मुसळधार पावसाचा सामना करावा लागला. याचा परिणाम पालेभाज्यांवर झाला आहे. जास्त पावसामुळे कोथिंबीराच्या पिकाचं नुकसान होतं. परिणामी कोथिंबीरीने महिलांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.