हायटेन्शन तारांना चुकून हात लागला; मायलेकीला विजेचा जोरदार झटका बसला अन् क्षणात... (File Photo : electricity-shock)
यवतमाळ : शेतातील कपाशीच्या पिकाला वन्य प्राण्यांपासून वाचविण्यासाठी थेट कुंपणाच्या तारेत वीज प्रवाह सोडला. पण यामुळे शेतात जागलीला असलेल्या शेतकरी दाम्पत्यालाच जीव गमवावा लागला. विजेचा धक्का लागून दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. पहाटेच्या दरम्यान घडलेली ही घटना शुक्रवारी (दि. 4) दुपारी उघडकीस आली.
पती-पत्नी एकाच जागीच मृतावस्थेत आढळून आले. आनंदा शंकर कोरंगे (40), अनिता आनंदा कोरंगे (वय 35, दोघे रा. रातचांदणा) अशी मृतांची नावे आहेत. कोरंगे दाम्पत्याची मुले यवतमाळातील वसतिगृहात शिकायला आहेत. त्यामुळे हे दाम्पत्य पूर्णवेळ शेतात वास्तव्याला होते. त्यांनी यंदा कपाशीचे पीक लावले. परिसरात रानडुकरांचा प्रचंड उपद्रव आहे. पिकांचे संरक्षण करण्यासाठी आनंदा कोरंगे यांनी शेतातील चारही बाजूने तारेचे कुंपण करून त्यात वीज प्रवाह सोडला.
दरम्यान, शुक्रवारी कोरंगे दाम्पत्य शेतात फेरफटका मारत असताना, त्यांचा जिवंत वीज तारेशी संपर्क आला. पतीला वाचविण्याच्या धडपडीत अनिताचाही त्या ताराला स्पर्श होऊन त्यांचाही मृत्यू झाला. यवतमाळात राहणाऱ्या मुलाने वडिलांना फोन केला. मात्र, परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. अखेर मुलाने शेजारच्या शेतकऱ्याला बाबा फोन उचलत नसल्याचे सांगितले.
नेमका काय प्रकार घडला, हे पाहण्यासाठी तो शेतकरी शेतात पोहोचला. तेव्हा कोरंगे दाम्पत्य मृतावस्थेत आढळले. त्यांनी घटनेची माहिती पोलिस पाटील नारायण भेंडे यांना दिली. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठले. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात आणले.