फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कारवाई केली (फोटो - सोशल मीडिया)
Phaltan Doctor suicide case: मुंबई : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. तिच्या आत्महत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गांभीर्याने दखल घेतली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात तैनात असलेल्या महिला डॉक्टर संपदा मुंडे गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभाग यांच्यात वादात अडकल्या होत्या. यानंतर तिने आत्महत्या केल्याने प्रकरणाची सर्वत्र चर्चा आहे. मृत डॉक्टरच्या हातावरील सुसाइड नोटमुळे या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या तक्रारीवर काय कारवाई केली? असा सवाल करत राज्य महिला आयोगाने सातारा एसपीकडून अहवाल मागविला आहे.
वैद्यकीय तपासणीच्या वादात अडकलेल्या या डॉक्टरवर गेल्या काही महिन्यांपासून दबाव होता, अशी माहिती समोर आली आहे. सुसाइड नोटमध्ये तिने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांनी चार वेळा बलात्कार केल्याचा आणि प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख केला आहे. या प्रकरणानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशीदेखील सुरू होती. या तणावामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यावेळी संपदा मुंडेने पोलीस अधिकाऱ्यावर थेट अत्याचार आणि छळाचे आरोप केले आहेत. त्यामुळे साताऱ्याच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आता दोन्ही आरोपी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्य महिला आयोगानेही याची दखल घेत सातारा पोलीस अधीक्षकांना सखोल तपासाचे निर्देश दिले आहेत. पीडितेने यापूर्वी तक्रार केली असल्यास त्यावर कारवाई का झाली नाही, याचीही चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. या प्रकरणावर राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, “आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचं पथक रवाना झालेलं आहे. बीड आणि पुणे या भागात आरोपींचा तपास सुरू आहे. खरं तर अशी घटना घडणं हे अत्यंत संतापजनक आहे. राज्य महिला आयोग म्हणून आम्ही याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात दोन्हीही आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तसेच मी स्वतः या प्रकरणात सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या संपर्कात आहे”, असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सातारा पोलीस अधीक्षकांकडून माहिती मागवली आहे, आरोपी गोपाल बदने याचे तत्काळ निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2)(N) आणि 108 अंतर्गत गुन्हा दाखल करत बदने आणि बनकर यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक रवाना झाले आहे.
काय आहे सुसाईड नोटमध्ये?
डॉ. संपदा मुंडे यांनी आपल्या ‘सुसाईड नोट’मध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की: “माझ्या मरणास पोलीस निरिक्षक गोपाल बदने जबाबदार आहे, ज्याने ४ वेळा माझ्यावर अत्याचार केले. तसेच, पोलीस प्रशांत बनकर यानेही मागच्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला.”






