अखेर दहिसर चेक नाक्याने घेतला मोकळा श्वास, प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना यश (फोटो सौजन्य-X)
Dahisar Check Naka News Marathi: मिरा -भाईंदर शहरातून मुंबईला जायला एकमेव पर्याय असलेला दहिसर टोलनाका येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत असते.आज त्याची प्रत्यक्ष पाहणी करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ त्याठिकाणी प्रभावी उपाययोजना करून तिथल्या समस्या सोडविण्यास प्रशासनाला सांगितले. याचदरम्यान दररोज दहिसर चेक नाक्यावर होणारे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवलेला उपाययोजनाला यश आले असून या चेकनाक्यावर लागणाऱ्या लांबच लांब रांगा आता कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
एखाद्या समस्येचा पाठपुरावा केल्याशिवाय त्याच्यावर नेमका तोडगा निघत नाही, हे मंत्री सरनाईक यांनी दहिसर टोल चेक नाक्याचा संदर्भात करून दाखवले. तब्बल तीन वेळा पाहणी करून, प्रत्येक वेळोवेळी सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी संबंधित ठेकेदारांनी केली का नाही, याचा पाठपुरावा करून वाहतूक कोंडीची समस्या बहुतांश सोडवण्यामध्ये मंत्र्यांना यश आले आहे.
सध्या दहिसर चेक नाक्यावर दोन्ही बाजूला केवळ दोन ,दोन लेन (दोन्ही बाजूने) अवजड वाहतुकीसाठी ठेवण्यात आले असून बाकीचा सर्व रस्ता मोकळा केलेला आहे. तसेच या संदर्भातील सूचना दोन्ही बाजूला ५०० मीटर अंतरावर ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हलक्या वाहनांना आपला वेग कमी न करता थेट टोलनाक्याच्या बाजूने विस्तीर्ण रस्त्यावरून पुढे जाता येते. याचबरोबर मुंबईकडे येणारी जड वाहतूक ही सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत मीरा-भाईंदर शहराच्या अलीकडेच रोखण्यात येणार आहे. त्यामुळे बाजूला लावलेल्या ट्रक मुळे रस्ता अरुंद होण्याची शक्यता आता धुसर झाली आहे. एवढे उपाय करून देखील भविष्यात वाहतूक कोंडी होत राहिल्यास सदर टोल नाका केवळ एक लेन साठीच सुरू राहील! बाकीचा सर्व रस्ता मोकळा केला जाईल. असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. यावेळी उपस्थित असलेल्या परिवहन व वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले!तसेच यापुढे वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला केल्या आहेत.
दरम्यान दररोज सकाळी व संध्याकाळी दहिसर चेक नाका परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. टोल ठेकेदारांनी हमरस्त्यावरील उभारलेल्या वेगवेगळ्या लेन मुळे वाहनांचा वेग मंदावतो. सहाजिकच त्यामुळे लांबलचक रांगा लागतात आणि सर्व सामान्य वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हे दूर करण्यासाठी तातडीने टोल ठेकेदारांनी हमरस्त्यावरील मुंबईकडे जाणार्या सहा रांगा पैकी केवळ ३ रांगा आणि येताना ४ पैकी २ रांगा अवजड वाहनांच्या टोल वसुलीला आरक्षित ठेवाव्यात. उर्वरित रस्ता हलक्या वाहनांसाठी मोकळा करण्यात यावा. जेणेकरून हलक्या वाहनांचा अडथळा दूर होऊन जलदगतीने वाहने चेक नाका परिसरातून निघून जातील, पर्यायाने वाहतूक कोंडी होणार नाही.






