बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या कन्या रेवती सुळे यादेखील मैदानात उतरल्या असून त्यांनी युगेंद्र पवार यांच्या समवेत बारामती शहरातून कार्यकर्त्यांसह पदयात्रा काढत मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या.
बारामतीमध्ये जोरदार प्रचार सुरू
बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी दिग्गज पदाधिकारी जोरदारपणे प्रचार करत आहेत. अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे स्वतः आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी सक्रिय आहेत.
कन्या रेवती सुळे प्रथमच निवडणूक प्रचारामध्ये
खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी कुटुंबातील अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार हे पत्नी शर्मिला पवार व पुत्र युगेंद्र पवार हे मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. गुरुवारी (दि २५) सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे प्रथमच निवडणूक प्रचारामध्ये उतरल्या आहेत. युगेंद्र पवार यांच्या समवेत त्यांनी बारामती शहरातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत पदयात्रा काढली.
सुप्रिया सुळे यांना चांगले मताधिक्य मिळणार
यावेळी अनेक मतदारांच्या घरी जाऊन भेटीगाठी देखील घेतल्या. यावेळी महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. दरम्यान, रेवती सुळे यांच्याशी प्रसिद्ध माध्यम आणि संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी बोलण्याचे टाळले. यावेळी युगेंद्र पवार म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे यांना चांगले मताधिक्य मिळणार आहे. जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा त्यांना मिळत आहे.
पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी
या पदयात्रेमध्ये प्रचार प्रमुख सदाशिव सातव, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख ॲड. राजेंद्र काळे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुनील शिंदे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सत्यव्रत काळे, महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुकाध्यक्ष वनिता बनकर, काँग्रेसचे वीरधवल गाडे, समीर ढोले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.