छत्रपती संभाजीनगर मधील दौलताबाद किल्ल्याला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या दौलताबाद किल्ल्याला बऱ्याच मुघल शाही आणि मराठ्यांच्या साम्राज्याचा इतिहास लाभलेला आहे. यादव वंशजांचा देवगिरी म्हणजे आता दौलताबाद म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला. या किल्याने यादव साम्राज्य उभारताना पाहिलं तसंच खिलजीने केलेल्या आक्रमणाचीही हा देवगिरी साक्ष आहे. इतिहासात डोकावून पाहिलं तर कोणे एके काळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हा किल्ला म्हणजे यादवांचा गौरवशाली वारसा होता. यादव वंशाच्या राजा भीमराज यादव यांनी इ.स. 1187 मध्ये केली होती. देवगिरी ही यादव साम्राज्याची राजधानी होती. हे शहर समृद्ध वैभवशाली आणि सुरक्षित मानले जात होते. किल्ल्याची रचना अत्यंत बळकट आणि रणनीतीनुसार उभारलेली असल्यामुळे शत्रूंना सहज जिंकता येणारा हा किल्ला नव्हता.
इ.स. 1296 मध्ये दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर आपले लक्ष केंद्रित केले. त्याकाळी यादव राजवंशाचे शासक रामचंद्र यादव होते. दक्षिणेतील राज्यांवर आपली सत्ता स्थापन करणं हे अल्लाउद्दीन खिलजीचं स्वप्न होतं. त्यासाठी देवगिरी हे खिलजीचं मुख्य लक्ष्य होतं. त्याला समजलं होतं की, यादवांचे राज्य दक्षिणेतील सर्वात महत्वाचं आहे. राजधानीत सोनं, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंचा साठा आहे. सत्ता आणि संपत्तीच्या हव्यासापोटी दिल्लीचा हा सुलतान दक्षिण भूमीत आला.
अल्लाउद्दीनने फार मोठी फौज न घेता, गुप्तपणे आणि चलाखीने देवगिरीकडे कूच केली. यादवांना या हल्ल्याची काहीच पूर्वकल्पना नव्हती पण किल्ल्याची नैसर्गिक रचना आणि मजबूत संरक्षण यामुळे खिलजीसाठी किल्ला सर करणं सोपं नव्हतं. यादव राजा रामचंद्राने पराकोटीचा प्रतिकार करत खिलजीशी झुंज कायम ठेवली, पण शेवटी अल्लाउद्दीनने किल्ल्याला वेढा घालता आणि रसद तोडून किल्ल्याच्या आतल्या लोकांना अन्नपाण्याशिवाय ठेवलं . काही दिवसांच्या लढाईनंतर रामचंद्र यादवने शरणागती पत्करली आणि देवगिरी खिलजीच्या ताब्यात गेला.
या विजयामुळे अल्लाउद्दीन खिलजीला दक्षिण भारतातील पहिलं यश मिळालं आणि त्याने देवगिरीवर आपली सत्ता स्थापन केली. यासगळ्यानंतर पुढील काही काळात मोहम्मद बिन तुघलक दक्षिणेवर चालून आला. देवगिरीचा हा किल्ला उत्तर व दक्षिण भारताच्या मध्यभागी येतो. संपूर्ण साम्राज्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी देवगिरी अधिक सोयीचं स्थान होतं. दिल्ली ही उत्तरेकडे होती आणि सुलतानाला दक्षिणेकडील प्रांतांवर सत्ता प्रस्थापित करायची होती. मोहम्मद बिन तुघलकने साम्राज्याच्या केंद्रस्थानी असलेल्या दौलताबादला राजधानी करण्याचा निर्णय घेतला, परंतु हा निर्णय अंमलात आणताना अनेक चुका झाल्या. त्यामुळे राजधानीचे स्थलांतर हा इतिहासातील एक अयशस्वी आणि विचित्र निर्णय मानला जातो.1327 मध्ये मोहम्मद बिन तुघलक याने देवगिरीचं नाव बदलून “दौलताबाद” केलं आणि दिल्लीहून राजधानी दौतलाबादकडे वळवली.
देवगिरी दक्षिण आणि उत्तर भारताच्या मध्याभागी आहे. त्यामुळे तुघलकाला वाटलं की, उत्तर आणि दक्षिण दोन्ही भागांवर नियंत्रण ठेवणं सोपं होईल. मात्र पुढील काही काळात दिल्लीमध्ये सतत बंडखोरी आणि राजकीय अस्थिरता वाढत गेली. त्यामुळे तुघलकला वाटलं, राजधानीचं स्थलांतर केल्यास राजकीय अस्थिरता स्थिर होईल. दक्षिण भारताच्या काही भागांवर तुघलकची सत्ता होती, पण म्हणाव तसा वचक नव्हता. राजधानी दक्षिणेकडे हलवल्यास, दक्षिणेकडील राज्यांवर प्रभाव टाकता येईल असा तुघलकाचा विचार होता. मात्र दक्षिणेचा प्रवाल कठीण होता आणि त्यात प्रशासन कोलमडलं. दौलताबाद राजधानीसाठी पूर्ण तयार नव्हतं. त्यामुळे काही वर्षांत राजधानी परत दिल्लीला हलवावी लागली.मोहम्मद बिन तुघलकने दौलताबादला राजधानी हलवण्याचा निर्णय बुद्धिमत्तेच्या अतिरेकातून घेतला, पण व्यवहारात अपयशी ठरला.हा निर्णय आजही इतिहासात “शहाणपणाचा अतिरेक आणि अंमलबजावणीत अपयश” याचं उदाहरण म्हणून पाहिला जातो.दिल्लीमध्ये सतत बंडखोरी, गोंधळ आणि राजकीय अस्थिरता वाढत होती.त्यामुळे तुघलकला वाटलं, राजधानीचं स्थलांतर केल्यास त्यापासून दूर राहता येईल.