पाटस/राजेंद्र झेंडे : दौंडच्या पूर्व भागातील मलठण, राजेगाव, वाटलूज, नायगाव या भागांतील वनक्षेत्रातील वनजमिनीतून बेकायदा वृक्षतोड, कोळसा खाणी आणि बेकायदा माती उत्खनन सुरू होते. या प्रकरणी पुणे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दौंडचे वनपाल रवींद्र धनाजी मगर व वनरक्षक किरण कदम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करीत निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
वन विभागाच्या मोठ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईने खळबळ
वन विभागाच्या तीन प्रमुख आणि मोठ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याने वनविभागात मोठी खळबळ उडाली. ग्रामस्थांनी मात्र या कारवाईचे स्वागत केले आहे. दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांच्यावर निलंबनाची कारवाईला पुणे वनविभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक दीपक पवार यांनी दुजोरा दिला आहे.
काही दिवसांपासून बेकायदा वृक्षतोड
दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील मलठण, वाटलुज , नायगाव, राजेगाव या गावांमधील भीमा नदीच्या पट्ट्यातील वन विभागाच्या वनक्षेत्रात तसेच उजनी संपादित केलेल्या क्षेत्रात मागील काही दिवसांपासून बेकायदा वृक्षतोड सुरू होती. तर राजेगाव, वाटलुज, नायगाव या भागात दहा ते पंधरा बेकायदा कोळसा भट्ट्या सुरू होत्या. याबाबत मलठण ग्रामस्थांनी दौंड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे कारवाईची लेखी मागणी केली होती.
बेकायदा कोळसा भट्ट्या मालकांना पसार होण्यास मदत
मात्र दौंड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांच्यासह या भागातील वनपाल व वनरक्षक यांनी प्रकरणाची दखल घेतली नाही. उलट बेकायदा वृक्षतोड करणारे आणि बेकायदा कोळसा भट्ट्या मालकांना पसार होण्यास मदत केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे तर सोडा, साधी चौकशी देखील केली गेली नाही. असा आरोप करीत मलठण ग्रामस्थांनी दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व वनरक्षक यांच्यावर कारवाई करण्याची लेखी तक्रार मलठण ग्रामस्थांनी पुणे वनविभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक दिपक पवार यांच्याकडे केली होती.
पुणे वन विभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षकांकडून तत्काळ कारवाई
या तक्रारीची त्वरित दखल घेत आणि घटनेचे गांभीर लक्षात घेऊन पुणे वन विभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक दिपक पवार यांनी बुधवारी ( दि ७) तालुक्यातील मलठण, राजेगाव, नायगाव, वाटलुज या भागातील वनक्षेत्राला भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांसोबत या परिसराची पाहणी केली. या भागातील वन विभागाच्या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून वनक्षेत्राचे मोठे नुकसान केल्याचे यावेळी निदर्शनास आले होते. तर काही ठिकाणी बेकायदा कोळसा भट्ट्या तसेच बेकायदा माती उत्खनन केल्याचे हे पाहणी दरम्यान दिसून आले होते.
संबंधितावर कारवाई करण्यास टाळाटाळ
यावेळी संबंधित बेकायदा वृक्षतोड करणारे तसेच संबंधितावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या वनपाल, वनरक्षक व तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यावरही गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी पवार यांच्याकडे केली होती. पवार यांनी घटनास्थळी पंचनामा करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते.
त्यानुसार पुणे विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते व सहायक उपवनसंरक्षक दिपक पवार यांनी शुक्रवारी ( दि. ९) दौंड वनपरिक्षेत्रातील दौंड परिमंडळातील राजेगाव नियतक्षेत्रातील राजेगाव, मलठण, नायगाव, वाटलुज या गावातील राखीव वनक्षेत्रात अवैध वृक्षतोडी अंदाजे क्षेत्र ५.५५१ हेक्टर आणि माती उत्खनन २३१३ घ.मी. झाले आहे. वनपाल रवींद्र मगर व वनरक्षक किरण कदम यांचे त्यांचे कार्यक्षेत्रातील कामावर तसेच वनसंरक्षणावर नियंत्रण नाही.
वनपाल आणि वनरक्षकांवर निलंबनाची कारवाई
प्रस्तुतप्रकरणी सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याने, चौकशीमध्ये / तपासामध्ये अडथळा निर्माण होण्याचा संभव आहे, म्हणून दौंड वनपाल रविंद्र मगर व वनरक्षक किरण कदम यांना निलंबन करण्याची कारवाई केली होती. आता बेकायदा वृक्षतोड आणि कोळसा भट्ट्या प्रकरणी दौंड तालुका वनपरिक्षेत्राधिकारी कल्याणी गोडसे यांना ही निलंबनाची कारवाई केली असून तसा आदेश देण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे वनविभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक दिपक पवार यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याने मलठण ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. आता वनविभाने संबंधित बेकायदा वृक्षतोड करणारे मुख्य सुत्रधार आणि कोळसा भट्ट्या मालकांवर ही गुन्हे दाखल करून अटक करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.






