फोटो - ट्वीटर अजित पवार
पुणे : विधानसभा निवडणूकांचा बिगुल लवकरच वाजणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. अनेक नेत्यांचे दौरे व रॅली सुर आहेत. सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जनसन्मान यात्रा सुरु झाली आहे. ही जनसन्मान यात्रा पुण्यामध्ये दाखल झाली असून अजित पवार विकासकामांच्या उद्घाटनासह जनतेशी संवाद देखीस साधणार आहेत.
पालकमंत्र्यांनी केले ध्वजारोहण
उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री देखील आहेत. त्यामुळे स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने अजित पवार यांनी पुण्यामध्ये ध्वजारोहण केले. पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी तिरंग्याला मानवंदना दिली. यावेळी अजित पवार यांच्यासोबत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन देखील उपस्थित होते. यानंतर अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेला सुरुवात केली. या यात्रेचा आज दुसरा टप्पा असून विविध लोकांच्या भेटी देखील घेणार आहे.
सिंहगड पूलाचे उद्घाटन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये देखील ध्वजारोहण केले. यावेळी ‘संविधान सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संविधानाची प्रस्तावना वाचन अभियान राबवण्यात आले. त्याचबरोबर अजित पवार यांनी सिंहगड रोड येथील बहुप्रतिक्षित अशा उड्डाणपूलाचे उद्घाटन केले. मागील अनेक दिवसांपासून हा पूल तयार होता. मात्र उद्घाटन करायला कोणीही नेता नसल्यामुळे उद्घाटनाचे काम रखडले होते. आज अखेर अजित पवार यांनी राजाराम पूल येथून पुलाचे उद्घाटन केले.
पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौकात नव्यानं उभारण्यात आलेल्या उड्डाणपूलाचं उद्घाटन केलं.
आज १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून नागरिकांच्या सुविधांचं लोकार्पण होत आहे, ही खरोखरंच नव्या समृद्धीची पहाट आहे ! pic.twitter.com/NHISUkGpPr
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 15, 2024
अशी असणार जनसन्मान यात्रा
अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सारसबाग येथून सुरु होणार आहे. तळ्यातील गणपतीचे दर्शन घेत अजित पवार यात्रेला सुरुवात करणार आहेत. त्याचबरोबर वडगावशेरी येथील तारकेश्वर मंदिराचे दर्शन घेणार आहेत. त्याचबरोबर लोहगावमध्ये अजित पवार माजी सैनिक व सेवानिवृत्त संरक्षण कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर हडपसरमध्ये एनजीओ व गृहनिर्माण पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. अजित पवार हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांशी देखील संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर बांधकाम करणाऱ्या मंजुरांशी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रेवेळी संवाद साधणार आहेत.