अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला 100 धावांनी हरवून पटकावेल जेतेपद(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG U19 World Cup Final LIVE : अंडर-१९ विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना हरारे येथील स्पोर्ट्स क्लबवर भारत १९ वर्षांखालील आणि इंग्लंड १९ वर्षांखालील संघ यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव करत अंडर-१९ विश्वचषक २०२६ चे जेतेपद पटकावले आहे. भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या १७५ धावांच्या जोरावर ९ गडी गमावून इंग्लंडसमोर ४१२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रतिउत्तरात इंग्लंडचा संघ ४०.२ षटकात ३११ धावांवरच गारद झाला आणि भारतीय संघाने विश्वविजेतेपदावर नाव कोरले. भारताकडून आरएस अम्ब्रिसने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
हरारे येथील स्पोर्ट्स क्लबवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर वैभव सूर्यवंशीने ८० चेंडूत १५ चौकार आणि १५ षटकरांच्या मदतीने १७५ धावांची खेळी केली. तर कर्णधार आयुष म्हात्रेने ५१ चेंडूत ७ चौकर आणि २ षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. तसेच अभिज्ञान कुंडूने ४० धावांचे योगदान दिले. भारतीय फलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडसमोर ४१२ धावांचे लक्ष्य दिले होते. इंग्लंडकडून जेम्स मिंटो सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, अॅलेक्स ग्रीन आणि सेबॅस्टियन मॉर्गन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मॅनी लुम्सडेनने १ विकेट घेतली.
भारतीय संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरेलल्या इंग्लंड संघाची सुरवात चांगली झाली नाही. त्यांनी १९ धावांवरच जोसेफ मूर्सच्या रूपात आपला पहिला गडी गमावला. त्यांनंतर बेन डॉकिन्स आणि बेन मेयेस यांनी भारतीय गोलंदाजांवर काही काळ दाबाव आणण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी ७४ धावांची भागीदारी रचली. परंतु, बेन मेयेस ४५ धावा करून बाद झाला. त्याला खिलन पटेलने बाद केले. त्यानंतर मात्र, इंग्लंड संघाची चांगलीच घसरगुंडी उडाली. १४२ धावांवर २ विकेट्स असताना इंग्लंडच्या १७४ धावांवर ७ विकेट्स गेल्या. बेन डॉकिन्सने अर्धशतक झळकवले आणि तो बाद झाला. त्याने ५६ चेंडूत ६६ धावा केल्या. त्याला आयुष म्हात्रेने माघारी पाठवले.
A complete performance as India conquer the #U19WorldCup for a record 𝒔𝒊𝒙𝒕𝒉 time 🏆🇮🇳 📝: https://t.co/MNF3RNneSb pic.twitter.com/9q4dNI4ZYr — ICC (@ICC) February 6, 2026
त्यानंतर, थॉमस रीव्हज ३१ धावा, राल्फी अल्बर्ट ० धावा, फरहान अहमद १ धाव आणि सेबॅस्टियन मॉर्गन ० धावा, जेम्स मिंटो २८ धावा, तर मॅनी लुम्सडेन ३ धावा काढून बाद झाले. तर कॅलेब फॉकनरने शतकी झुंज दिली खरी परंतु तो संघाला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरला. त्याने ६७ चेंडूत ११५ धावा केल्या. त्याला कनिष्क चौहानने बाद केले आणि भारताच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अॅलेक्स ग्रीन ० धावांवर नाबाद राहिला. भारताकडून आरएस अम्ब्रिसने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. खिलन पटेल आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
इंग्लंड १९ वर्षांखालील प्लेइंग इलेव्हन: बेन डॉकिन्स, जोसेफ मूर्स, बेन मेयेस, थॉमस रीव्हज (कर्णधार), कॅलेब फॉकनर, राल्फी अल्बर्ट, फरहान अहमद, सेबॅस्टियन मॉर्गन, जेम्स मिंटो, मॅनी लुम्सडेन, अॅलेक्स ग्रीन
भारत १९ वर्षांखालील प्लेइंग इलेव्हन: आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू आरएस अम्ब्रिस, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन






