फोटो - ट्वीटर
उदगीर : राज्य सरकारकडून माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. अल्पावधीमध्ये ही योजना लोकप्रिय ठरली असून कोट्यवधी रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. मात्र सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना चर्चेच्या आणि टीकेच्या वर्तुळामध्ये राहिली आहे. ही योजना चुनावी जुमला असल्याची टीका विरोधकांनी केली. तसेच निवडणूकीपूरते पैसे खात्यामध्ये जमा होतील असे देखील विरोधकांकडून सांगण्यात आले आहे. यावरुन राजकारण रंगलेले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत वक्तव्य केले. या योजनेला राजकीय चष्म्यातून पाहू नये असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केले आहे.
विरोधासाठी न्यायालयात जाणारे कॉंग्रेस निकटवर्तीय – फडणवीस
उदगीरमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भव्य बुद्धविहार लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत विरोधक योजनेवरुन राजकारण करत असल्याचा आरोप केला. फडणवीस म्हणाले, “राज्यातील महायुती सरकार महिलांना मजबूत आणि सक्षम करण्याचे प्रयत्न करत आहे. त्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. मात्र, काही लोक लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात गेले. न्यायालयात जाणारी ही व्यक्ती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची निवडणूक प्रमुख म्हणून काम करते,” असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
योजनेकडे राजकीय चष्म्यातून पाहू नये
पुढे त्यांनी लाडकी बहीण योजनेचे राजकारण करु नये, असे देखील मत मांडले. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “माझी विरोधकांना विनंती आहे की, त्यांनी लाडकी बहीण योजनेकडे राजकीय चष्म्यातून पाहू नये. या योजनेला विरोध करुन नका. ही योजना आपल्या सर्वसामान्य बहिणींसाठी आहे. दिवसभर राबणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होतात तेव्हा त्यांना त्याचं मोल कळतं. जे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत त्यांना या 1500 रुपयांचे मोल कळणार नाही. पण आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली काहीही झालं तरी ही योजना सुरु ठेवू. तुमचा आशीर्वाद पाठीशी आहे तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करु शकणार नाही. लाडक्या भावांनाही आम्ही शेतकऱ्यांसाठी वीजबिल माफ आणि तरुणांसाठी कार्य प्रशिक्षण योजना सुरु करून मदत करत आहे,” असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.