CM Devendra Fadnavis यांची ठाकरे बंधूंच्या वाचननामावर जोरदार टीका
Pune Politics: दादा, हाच का तुमचा वादा? सुस बाणेरकरांनी भर प्रचार सभेत अजित पवारांना दाखवला आरसा
कांदिवली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘मामू उद्धवजी’ असा करत खोचक टीका केली. तसेच ठाकरे बंधूंनी जाहीर केलेला दस्तऐवज वचननामा नसून वाचूननामा आहे, अशी उपरोधिक टिप्पणीही त्यांनी केली.
फडणवीस म्हणाले, “आज सकाळी एक वचननामा जाहीर झाला. काल आई जिजाऊंची जयंती होती, तेव्हा देखील तो जाहीर करता आला असता. पण अलीकडे वंदे मातरमला ॲलर्जी असलेल्या लोकांसोबत काही जुने मित्र बसायला लागले आहेत, त्यामुळे आता कोणकोणत्या गोष्टींची ॲलर्जी होते हे वेगळं सांगायची गरज नाही. आज आमचे मामू म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धवजी आणि नव्याने प्रेम जुळलेले राजजी यांनी हा तथाकथित वचननामा जाहीर केला. खरं तर वचननामा देण्याचा अधिकार फक्त बाळासाहेब ठाकरे यांनाच होता. आज जो जाहीर झाला, तो वचननामा नव्हे तर वाचूननामा होता आणि त्यांनी काय वाचलं, हे त्यांनाही माहिती नाही.”
ते पुढे म्हणाले, “एका वृत्तवाहिनीने २०१७ मधील उद्धव ठाकरेंच्या आश्वासनांवर फॅक्ट-चेक केला होता. त्यात एकही आश्वासन पूर्ण झालं नसल्याचं समोर आलं. आता हे वचननामा जाहीर करताना एकमेकांत काहीतरी कुजबुजत होते. मग विचार आला ते नेमकं काय बोलत असतील?’झूठों ने झूठों से कहा सच बोलो. अरे भाई, दो भाई का ऐलान हुआ सच बोलो. घर के अंदर झूठों की एक मंडी है, दरवाजा पर लिखा है सच बोलो’ अशा पद्धतीने २५ वर्षे राजकारणात राहूनही पुन्हा तेच-तेच सांगताना जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे,” अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.






