फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा-त्र्यंबकेश्वर घाटात सोमवारी मध्यरात्री एका अज्ञात वाहनाच्या धडकेने तरस या वन्य प्राण्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मोखाडा फाटा आणि त्र्यंबकेश्वर दरम्यानच्या जंगलमय घाटमाथ्यावर घडली. या अपघातामुळे या भागातील वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तरस हा संपूर्ण महाराष्ट्रात दुर्मीळ होत चाललेला प्राणी असून, जव्हार आणि मोखाडा परिसरात याची संख्या तुलनेत अधिक आहे. याशिवाय, या भागात किमान सहा बिबटे आहेत, अशी नोंद वन विभागाकडे आहे. रात्रीच्या वेळी हे प्राणी अन्नाच्या शोधात रस्त्यांच्या परिसरात येत असतात. त्यामुळे वाहनधारकांनी सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.
सध्या मोखाडा-त्र्यंबकेश्वर आणि मोखाडा-खोडाळा या रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे. परंतु, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी जैवविविधतेने समृद्ध जंगल असल्याने, या कामामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होऊन वन्यजीवांचे अधिवास नष्ट होण्याची शक्यता आहे. परिणामी, बिबटे, तरस आणि अन्य प्राणी मानवी वस्त्यांकडे वळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच संरक्षित वन परिसरांमध्ये एन्ट्री आणि एक्झिट पॉइंटवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. यामुळे वन्य प्राण्यांच्या हालचाली तसेच वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर, विशिष्ट वेळेनंतर या मार्गांवर वाहनांची वाहतूक मर्यादित करण्याचा पर्याय देखील शासनाच्या विचाराधीन आहे.
निसर्गप्रेमी आणि पर्यावरणतज्ज्ञांनी रस्ते रुंदीकरणासोबतच पर्यावरणपूरक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. यात अंडरपास, ओव्हरपास, सौरदिवे आणि वन्यजीवांसाठी स्वतंत्र कॉरिडॉर तयार करण्याचा समावेश असावा, अशी सुचवणूक देण्यात आली आहे. वन विभागाने वाहनचालकांना विनंती केली आहे की, रात्रीच्या वेळेस गाडी सावकाश चालवावी, हॉर्नचा वापर मर्यादित करावा आणि अत्यावश्यक नसल्यास जंगल रस्त्यावरून प्रवास टाळावा. कारण या भागात आधीही बिबट्यांसह अन्य प्राण्यांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. वाढती वाहतूक, अवैध प्रवास आणि मानवी दुर्लक्ष यामुळे या घटनांमध्ये वाढ होत आहे.
या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, विकास आणि पर्यावरण यामध्ये संतुलन राखणे अत्यावश्यक आहे. अन्यथा जैवविविधतेला धोका पोहोचून भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.