स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर परिवहनमंत्र्यांची मोठी घोषणा; 15 एप्रिलपर्यंत...(फोटो सौजन्य-X)
मुंबई : पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकात लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली. एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. यामध्ये आरोपीने गोड बोलून पीडितेला फूस लावली. फलटणला निघालेल्या तरुणीला त्यानं शिवशाही बसमध्ये नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव आहे. याप्रकरणानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यावर आता राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठं विधान केलं आहे. 15 एप्रिलपर्यंत बंद बसेस एसटीच्या ताफ्यातून काढून टाकणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा : Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल राज्यसभेवर जाणार? दिल्लीतील पराभवानंतर आप मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
स्वारगेट प्रकरणातील आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित बसस्थानकावरील कार्यरत असलेले स्थानकप्रमुख (सहाय्यक वाहतूक अधिक्षक) व आगार व्यवस्थापक यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय चौकशी करून दोष आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करावे, असे निर्देश उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रभारी विवेक भीमनराव यांना दिले आहेत. तसेच एकूणच महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी एसटीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलाविण्याचे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी दिले. त्यानुसार, आता ही बैठक होताना दिसत आहे.
दरम्यान, मंत्रालयात एसटीच्या अधिकाऱ्यांची बैठक होत आहे. तत्पूर्वी मंत्री सरनाईक यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘एआयचा वापर करून सुधारणा करणार आहे. 15 एप्रिलपर्यंत बंद बसेस एसटीच्या ताफ्यातून काढून टाकणार आहे. एसटी बसमध्ये सीसीटीव्ही, जीपीएस लावण्यात येणार आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्यासाठी शक्ती कायद्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जाणार आहे’.
जुन्या बसेस काढून टाकणार
बसस्थानक परिसरातील जुन्या बसेसची ताबडतोब विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. कारण या बसेसकडे दुर्लक्ष होत असल्याने या बसेस एकप्रकारे अवैध धंद्याचे अड्डे बनतात आणि त्यातून अशा घटनांना प्रोत्साहन मिळते. त्यामुळे भविष्यात कोणत्याही बसस्थानक परिसरात अशा प्रकारच्या निर्लेखित केलेल्या बसेस उभ्या करण्यात येऊ नयेत, असे निर्देशही परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
हेदेखील वाचा : त्या नराधमाचा क्रूर चेहरा समोर…, स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार प्रकरणातील नराधमाचा फोटो आला समोर