फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा तालुक्यातील खोडाळा या महत्त्वाच्या बाजारपेठेत ग्रामीण रुग्णालयासाठी मंजुरी मिळाल्याची घोषणा झाल्याने ग्रामस्थांमध्ये एक आशेचा किरण दिसला होता. कारण खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रावर केवळ मोखाडा तालुक्यातीलच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील श्रीघाट, देवगाव, वैतरणा, आस्वली, कोजूली, सामूंडी ते पहिणा, तसेच इगतपुरी आणि त्र्यंबक तालुक्यातीलही रुग्ण मोठ्या प्रमाणावर येतात. जवळपास 24 महसुली गावे आणि 60 हून अधिक गावपाड्यांतील लोकांना या केंद्रावर अवलंबून राहावे लागते. या वाढत्या गर्दीसमोर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असल्याने 2016 पासूनच येथे ग्रामीण रुग्णालयाची मागणी होत होती. स्थानिक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि नेतेमंडळींनी वारंवार शासनाकडे प्रस्ताव सादर केला, पाठपुरावा केला. तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनीही सकारात्मक भूमिका घेतली होती. त्याचाच परिणाम म्हणून अखेर 2024 मध्ये घटस्थापनेच्या दिवशी 30 खाटांच्या श्रेणीवर्धन प्रस्तावाला लिखित मंजुरी मिळाली.
या मंजुरीनंतर लवकरच कामाला सुरुवात होईल, ग्रामीण रुग्णालयाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी धरली होती. तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनीही अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. उपस्थित अधिकारी वर्गानेही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र मंजुरी मिळून आता वर्ष उलटले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. अजूनही ग्रामीण रुग्णालयाचे चिन्ह धुसर दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. मंजुरी असूनही कार्यवाही का होत नाही? नेमकं घोडं अडलंय कुठं? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
दरम्यान, खोडाळा ग्रामपंचायतीने ग्रामीण रुग्णालयासाठी 5.20 हेक्टर इतकी जागा उपलब्ध करून दिली आहे. उपलब्ध प्राथमिक आरोग्य केंद्राची जागा जिल्हा शल्यचिकित्सक विभागाकडे हस्तांतरित करून तिथेच 30 खाटांचे श्रेणीवर्धन करण्याचा आराखडा आहे. मात्र केवळ कागदोपत्री मंजुरीवर ग्रामीण भागातील लोकांचा जीव अडकलेला आहे. आदिवासी निष्कांचन रुग्णांना संदर्भ सेवा मिळवण्यासाठी लांबच्या रुग्णालयांचा प्रवास करावा लागतो, त्यामुळे त्यांची प्रचंड दमछाक होते. ही वस्तुस्थिती लक्षात घेता ग्रामीण रुग्णालयाची तातडीची गरज अधोरेखित होते.
सत्ताधारी, विरोधक, स्थानिक नेते, अधिकारी, सर्वांनी मिळून प्रयत्न केले तरीही अजून काम प्रत्यक्षात सुरू न झाल्याने लोकांच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. मंजुरीनंतरही प्रत्यक्ष रुग्णालयाची इमारत उभी राहून सेवा सुरू होण्याचीच प्रतीक्षा आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा एकच स्वर आहे – “तो दिवस लवकर दिसू दे, जेव्हा खोडाळा ग्रामीण रुग्णालय सुरू होईल आणि परिसरातील रुग्णांची खरी दिलासा देणारी सेवा सुरू होईल.”