Devendra Fadnavis (Photo Credit- X)
चंद्रपूर: चंद्रपूर आणि गडचिरोली हा परिसर लवकरच ‘इंडस्ट्रियल मॅग्नेट’ म्हणून उदयास येत असून, या औद्योगिक विकासामुळेच एक समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. खनिज विकास निधीतून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमुळे या भागातील दीड लाख लोकांना रोजगार मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे मुल (जि. चंद्रपूर) येथील विश्रामगृहात जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘कॉफी टेबल बुक’चे अनावरण करताना बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ज्या ठिकाणी उत्खनन होते, तेथील नागरिकांना खनिज निधीचा थेट फायदा झाला पाहिजे, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. चंद्रपूर जिल्ह्यात खनिज उत्खनन आणि वाहतुकीमुळे स्थानिकांना होणाऱ्या त्रासाची भरपाई म्हणून, खनिज निधीचा सर्वाधिक लाभ त्यांनाच मिळाला पाहिजे.
Chandrapur & Gadchiroli: Emerging as Maharashtra’s New Industrial Magnets! ⚙️🌱 Released the Coffee Table Book prepared by the District Mineral Foundation at Mul, Chandrapur today. Hon PM Narendra Modi Ji has envisioned that locals must avail maximum benefits from Industries in… https://t.co/pAiTrNOatV pic.twitter.com/hc5oj2vclQ — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 28, 2025
चंद्रपूर जिल्ह्याने टाटा ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल, कौशल्य-आधारित रोजगार, आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसारखे अनेक चांगले प्रकल्प हाती घेतले आहेत. हे सर्व प्रकल्प चांगल्या प्रकारे राबवले जात असल्याबद्दल त्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.
दीड लाख लोकांना रोजगार देण्याची क्षमता असलेल्या या प्रदेशाच्या औद्योगिक विकासासोबत पर्यावरणाचे संतुलन राखणेही महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. “चंद्रपूरने औद्योगिकीकरणासोबतच पर्यावरणाचे संतुलन राखले, असा संदेश जगभर गेला पाहिजे,” असे ते म्हणाले. १०० टक्के स्थानिकांना रोजगार मिळेल अशी व्यवस्था निर्माण करण्यावर सरकारचा भर असल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, संपूर्ण भारतात केवळ महाराष्ट्र राज्याने आपले ग्रीन कव्हर वाढवले आहे. आता संपूर्ण महाराष्ट्राचे वनक्षेत्र ३३ टक्क्यांच्या वर नेण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यानेही वृक्ष लागवडीचे मोठे उद्दिष्ट गाठावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, आमदार सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे यांच्यासह जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह व इतर अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले, तर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आभार मानले.