फोटो - टीम नवराष्ट्र
नागपूर : लोकसभेची निवडणूक मागील महिन्यामध्ये पार पडली. यामध्ये आलेल्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व निकालाची जबाबदारी घेत राजकारणातून संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली. याचबरोबर संघटनात्मक काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांवर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत सूचक विधान केलं आहे. केंद्रीय नेतृत्व योग्य तो निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी 1200 कोटीहून अधिक रुपयांचा निधी दिला. या जिल्ह्याच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजूरांसाठी, जिल्ह्यातील रस्त्यांसाठी, जिल्हा परिषदेच्या कामांसाठी तसेच जवळपास 75 वेगवेगळ्या विभागांसाठी विकास कामे केली जाणार आहेत. कधी काळी 200 कोटी रुपये नागपूरसाठी मिळायचे. मात्र, आता 1200 कोटी रुपये नागपूर जिल्ह्याला मिळाले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे आम्ही आभार मानतो”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
बावनकुळेंचं फडणवीसांबाबत सूचक विधान
“देवेंद्र फडणवीस हे उत्कृष्ट संघटक आहेत. शासन आणि प्रशासनामध्ये काम करण्याचा त्यांचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे संघटनेला मोठा फायदा होईल. मात्र, याबाबत केंद्रीय नेतृत्व योग्य तो निर्णय घेतील. पण माझ्या दृष्टीने केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतल्यास आम्हाला मान्य राहील. मात्र, महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेसाठी त्यांचं येथील सरकारमधील स्थान महत्वाचं आहे. तसंच संघटनेमधीलही स्थानही महत्वाचं आहे. त्यामुळे आम्हाला हेच वाटेल की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात राहावं. कारण ते आमचे नेते आहेत”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर चर्चांना उधाण आले आहे.