
भूममधील बौद्ध विहार हल्ल्याप्रकरणी संताप; आरपीआयकडून ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत कारवाईची मागणी
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : भूम शहरातील भीमनगर परिसरात बौद्ध समाज व पवित्र बौद्ध विहारावर झालेल्या कथित हिंसक हल्ल्याच्या निषेधार्थ आरपीआयच्या (खरात) वतीने जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली येथील जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणी संबंधित आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी ॲक्ट) कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, १४ मे रोजी सुमारे १५० ते २०० जणांच्या जमावाने भूमच्या भिमनगर परिसरात प्रवेश करून पवित्र बौद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा परिसर तसेच समाजबांधव व महिलांवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेदरम्यान मोठ्या प्रमाणात दगडफेक, तोडफोड आणि गोंधळ घालण्यात आल्याने परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. या घटनेप्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत दंगल, धार्मिक भावना दुखावणे, महिलांवर अत्याचार, तोडफोड आणि जीवितास धोका निर्माण केल्याच्या गंभीर कलमांनुसार गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच भीमनगर परिसरातील निष्पाप बौद्ध तरुणांवर दाखल करण्यात आलेले कथित खोटे गुन्हे आणि एफआयआर क्रमांक ३०३/२०२६ तातडीने रद्द करण्यात यावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना शासनामार्फत आर्थिक मदत व मोफत उपचार मिळावेत, नुकसानग्रस्त वाहनांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी स्वतंत्र विशेष तपास पथकाकडून (SIT) करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
याशिवाय भीमनगर परिसर, पवित्र बौद्ध विहार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला कायमस्वरूपी पोलीस संरक्षण द्यावे व परिसरात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या निवेदनावर परिसरातील शेकडो बौद्ध बांधव व महिला भगिनींच्या स्वाक्षऱ्या असल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाने तातडीने निष्पक्ष कारवाई न केल्यास भूम येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आरपीआयचे (खरात) जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी दिला. यावेळी भीम आर्मी महाराष्ट्र अध्यक्ष अशोक कांबळे, महावीर गायकवाड, प्रबुद्ध गायकवाड, बाबासाहेब ओव्हाळ, निवृत्ती हौसलमल यांच्यासह अनेक कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.