उपमुख्यमंत्री अजित पवार (फोटो- सोशल मिडिया)
बारामती/अमोल तोरणे: श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी श्री जय भवानी माता पॅनेल विरुद्ध श्री छत्रपती बचाव पॅनेल अशी दुरंगी लढत सुरू असून दोन्ही गटाकडून आरोपांच्या फैरी झडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत दत्तात्रय भरणे व कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक या तिघांनी एकत्र येऊन निर्माण केलेल्या सर्वपक्षीय श्री जय भवानी माता पॅनेलला कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, भाजप नेते तानाजीराव थोरात, छत्रपती शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष मुरलीधर निंबाळकर, भाजपचे अविनाश मोटे या नेत्यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या श्री छत्रपती भवानी माता पॅनलने आव्हान दिले आहे. विविध प्रचार सभांमध्ये या दोन्ही गटांमध्ये आरोपांच्या फैरी झडत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भविष्यातील बेरजेचे राजकारण लक्षात घेऊन पृथ्वीराज जाचक यांच्याशी दिलजमाई करत त्यांना अध्यक्षपद देण्याचे जाहीर करून श्री जय भवानी माता पॅनेलचे पॅनल प्रमुख केले आहे. सध्या छत्रपती सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी जाचक यांच्याशी समझोता करून त्यांच्यावर कारखान्याचे नेतृत्वाची धुरा सांभाळण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान नुकताच श्री जय भवानी माता पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ भवानीनगर येथील श्री भवानी माता मंदिरात संपन्न झाला. या ठिकाणी आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री पवार यांनी उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्यांची समजूत काढत असताना जर कोणी गडबड केली, तर त्यांना पुन्हा आपल्या दारात उभा करणार नसल्याचा इशारा देत विरोध करायचा असेल तर उघड करा, बाहेरून एक व आतून एक असे चालणार नसल्याचे त्यांनी या सभेत स्पष्ट केले होते.
दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर विरोधी श्री छत्रपती बचाव पॅनल मधील सहा उमेदवारांचा पाठिंबा मिळवून घेण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यशस्वी झाले. दरम्यान श्री जय भवानी माता पॅनलचा देखील शुभारंभ भवानी माता मंदिरातच झाला. गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणापासून थोडेसे बाजूला असलेले कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांनी छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सभासदांमध्ये नाराजी असल्याचे सांगत या सभासदांचा रोष लक्षात घेऊन आपण तीन तासात पॅनल तयार केले असल्याचे स्पष्ट करत आपल्या कार्यकाळात आपण सभासदांना २६०१ रुपये दर तर कामगारांना देखील उच्चांकी बोनस दिला होता. त्यानंतर उच्चांकी दर का दिला नाही असा सवाल करत या निवडणुकीत गुलाल आपलाच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तानाजी थोरात , मुरलीधर निंबाळकर, अविनाश मोटे यांनीदेखील कारखान्याच्या सत्ताधारी गटावर टीका करत विजय आपलाच असल्याचा दावा केला आहे.
Ajit Pawar: ‘सगळी सोंग करता येतात,पण…”; छत्रपती कारखान्याबाबत काय म्हणाले DCM अजित पवार?
दरम्यान छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री जय भवानी माता पॅनल मध्ये इच्छुकांची मोठी संख्या होती. मात्र २१ उमेदवार हवे असल्याने अनेक इच्छुक नाराज झाले. या नाराजांना शांत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे व पृथ्वीराज जाचक हे तीनही नेते प्रयत्न करत आहेत, यामध्ये अनेक नाराज उमेदवारांना शांत करण्यात यश आले आहे. तरीदखील अंतर्गत नाराजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न विरोधी गट करत आहे. दरम्यान छत्रपती कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकहाती सत्ता आहे. छत्रपती कारखाना कोणत्या परिस्थितीत आपण अडचणीतून बाहेर काढू, असा दावा करत त्यांनी छत्रपती शिक्षण संस्थेला निवडणुकीनंतर मदत देण्याचे जाहीर केले.
छत्रपती कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पृथ्वीराज जाचक यांच्यासारख्या उत्तम प्रशासकाची गरज असल्याचे सभासद बोलून दाखवत आहेत. विरोधी गटाकडे अविनाश घोलप यांची असलेली ताकद सत्ताधारी गटाला काही प्रमाणात टेन्शन देणारी आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय घडामोडी पासून दूर असलेल्या अविनाश घोलप यांचा करिष्मा या निवडणुकीत कितपत चालणार, हे दखील महत्त्वाचे आहे. दरम्यान छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र इंदापूर तालुक्यासह बारामती तालुक्यामध्ये आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे या दोन नेत्यांचे प्राबल्य या दोन्ही तालुक्यांवर आहे. अजित पवार यांना मानणारा वर्ग इंदापूर तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचबरोबर दत्तात्रय भरणे यांना देखील मानणारा मोठा वर्ग इंदापूर तालुक्यात आहे. पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वावर सभासदांचा विश्वास आहे, या बाजू सत्ताधारी गटाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.
दरम्यान सत्ताधारी श्री जय भवानी माता पॅनलला विरोधी पॅनलचे नेते माजी इंदापूर पंचायत समिती सभापती तुकाराम काळे यांनी पाठिंबा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा कारखाना कार्यक्षेत्रात होणार आहेत, त्यामुळे सत्ताधारी गटाला आणखी किती नेते मिळणार, हे तर काही दिवसात स्पष्ट होणार आहे. विरोधी असलेल्या श्री छत्रपती बचाव पॅनल ने जोरदार मोर्चे बांधणी केली असली तरी त्यांची ताकद तुलनेने कमी पडत आहे.