छत्रपती संभाजीनगर : मराठा कुणबी, कुणबी-मराठा जातप्रमाणपत्रांचे वाटप सेतू सुविधा केंद्र, तलाठी आणि तहसील कार्यालयातून सुरु आहे. मराठवाड्यात आतापर्यंत २१ कोटी ६२ लाख ६ हजार ४८४ नोंदी तपासण्यात आल्या आहेत. त्यातून ४२ हजार ९०७ कुणबी नोंदी जिल्हा प्रशासनाला आढळून आल्या आहेत. या नोंदी मराठवाड्यातील १ हजार ४३७ गावात आढळल्या आहेत. तर प्रशासनाकडे ७३ हजार ११३ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ६० हजार ८१० जणांना जातप्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने निवृत्त न्यायमुर्ती शिंदे समितीच्या निर्देशानुसार १९६० पुर्वीच्या नोंदी तपासण्याचे काम सुरु करण्यात आले. कुणबी-मराठा, मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी प्रशासनाने महसूल, भूमिअभिलेख, नोंदणी, पोलीस प्रशासन, शालेय निर्गम उतारा यासह सरकारी कार्यालयातील नोंदी तपासण्यास सुरुवात केली.
गेल्या सहा महिन्यात राज्यासह मराठवाड्यातील नोंदी तपासण्यात आल्या. नोंदी आढळून आल्यानंतर नागरिक जातप्रमाणपत्र काढण्यासाठी जात नव्हते. त्यामुळे गावोगावी दवंडी देऊन नागरिकांना जातप्रमाणपत्र काढण्यासाठी प्रवृत्त करण्याची मोहिम हाती घेण्यात आली. या मोहिमेनंतर जातप्रमाणपत्र वाटप सुरु आहे.